September 11, 2025

पुणे: कात्रज–कोंढवा रस्ता, फुलेवाडा स्मारक यांसाठी भूसंपादनाला वेग; महापालिकेचा टास्कफोर्स गठीत

पुणे, ८ जुलै २०२५: शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी महसूल, नगररचना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत महापालिकेच्या एकूण ४२ भूसंपादन प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यापैकी ३४ प्रस्ताव हे पथ विकासाशी संबंधित आहेत. आयुक्त राम यांनी सांगितले की, कात्रज–कोंढवा रस्ता, सातारा–मुंबई रस्ता आणि पुणे–हडपसर–सोलापूर रस्ता या तीन प्रमुख मार्गांवरील भूसंपादनाची कार्यवाही येत्या ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याशिवाय, सनसिटी–कर्वेनगर पूल, महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक प्रकल्पांशी संबंधित भूखंडांचे संपादनही गतीने केले जाणार आहे.

ही टास्क फोर्स दर आठवड्याला एकदा बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेणार असून, भूसंपादन प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करत समन्वयाने काम करणार आहे. दरमहा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला जाणार आहे.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त शकुंतला बारवे, मोजणी व महसूल विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित, टीडीआर-एफएसआयचा पर्याय पुढे

महापालिकेच्या ८२ तातडीच्या प्रकल्पांसाठी भूसंपादन अत्यावश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेसाठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांची गरज असून, निधीअभावी महापालिकेकडून टीडीआर व एफएसआय द्वारे मालकांशी वाटाघाटी करण्याचा पर्याय स्वीकारण्यात येणार आहे.

दरम्यान, कात्रज–कोंढवा रस्त्याचे भूसंपादन प्राधान्याने केले जाणार असून, यासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कामासाठी आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध केला जाईल, असेही आयुक्त राम यांनी स्पष्ट केले. तसेच, सनसिटी ते कर्वेनगर रस्त्यासाठी प्रस्तावित पूलाच्या ॲप्रोच रोडसाठी तातडीने अधिसूचना काढण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.