September 21, 2025

पुणे: महापालिका आयुक्त गेले आणि उघड झाली स्वच्छतेची सगळी पोलखोल; ५५ कोटींचा प्रस्तावही फेटाळला

पुणे, ८ जुलै २०२५: महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अचानक वारजे दौऱ्याने शहरातील स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल झाली. रस्त्यांवर पडलेले कचऱ्याचे ढीग, झाडले न गेलेले मार्ग आणि अनुपस्थित कर्मचारी असे गंभीर वास्तव उघडकीस आले, ज्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.

आयुक्तांनी पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना थेट फोनवरून जाब विचारताच सफाई विभागाची धावपळ सुरू झाली. मात्र ही परिस्थिती फक्त वारजेसाठी मर्यादित नसून संपूर्ण पुण्यातील आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार शहरातील ४० टक्क्यांहून अधिक झाडणकाम करणारे कर्मचारी प्रत्यक्षात कामावरच नसतात. अनेक ठिकाणी महापालिकेचा पगार घेतलेले कर्मचारी इतर व्यक्तींना आपले काम करायला लावत असल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत.

शहरातील स्वच्छतेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च होतोय, पण अपेक्षित परिणाम मात्र दिसून येत नाही. यावर आयुक्त राम यांनी अधिक नियंत्रण ठेवण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमवेत स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला होता, पण आजची पाहणी ही सुधारणा केवळ कागदावरच असल्याचे दाखवून देत आहे.

५५ कोटींचा देखभाल प्रस्ताव फेटाळला

महापालिकेच्या कचरा वाहतूक यंत्रणेसाठी ८० छोटा हत्ती वाहनांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तब्बल ५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र आयुक्त नवल किशोर राम यांनी, “इतक्या कमी क्षमतेच्या वाहनांसाठी एवढा मोठा खर्च आवश्यक आहे का?” असा थेट सवाल करत, हा प्रस्ताव फेटाळून लावला.

“महापालिकेचा निधी योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात खर्च होणं आवश्यक आहे. यासाठीच सुधारणा आणि कठोर उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत,” असे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.

नागरिकांतूनही आता स्वच्छतेच्या केवळ घोषणांपेक्षा प्रशासनाने कृतीतून सुधारणा दाखवावी, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त होत आहे.