पुणे, १२ जुलै २०२५: “मी पळपुटा नाही, घाबरणारा नाही. लढणारा आहे. आम्ही काहीही चुकीचं केलं नाही, त्यामुळे आम्हाला न्यायालयातून नक्कीच न्याय मिळेल. आता ही लढाई सुप्रीम कोर्टात जाईल.” — अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर प्रतिक्रिया दिली.
पुण्यात मोदी बाग येथे पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी सांगितले की, ईडीकडून गेल्या वर्षी दोनदा प्रत्येकी १२ तास चौकशी झाली. सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती दिल्यानंतरही काही सापडलं नाही, तरीसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात आलं. हे केवळ माझा आवाज दाबण्यासाठी केलं जात आहे.
“मी आवाज उठवतोय, म्हणून आरोपपत्र दाखल”
“मी अधिवेशनात सरकारविरोधात ठामपणे बोलतो आहे, म्हणूनच माझ्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. आजही मी माझ्या विचारांशी ठामपणे उभा आहे, आणि पुढेही राहीन,” असे पवार यांनी स्पष्ट केले.
कन्नड कारखान्याच्या खरेदीचा इतिहास
कन्नड कारखान्याच्या खरेदीबाबत माहिती देताना पवार म्हणाले, “२००९ मध्ये मॅक बँकेने ३२ कोटींच्या कर्जबुडव्यामुळे कारखाना विक्रीसाठी टेंडर काढले. २०११ मध्ये नाबार्डच्या वार्षिक तपासणीत मॅक बँकेच्या आर्थिक स्थितीत त्रुटी आढळून आल्या, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला. प्रशासकाच्या कार्यकाळातच तिसऱ्या टेंडरच्या माध्यमातून २०१२ मध्ये बारामती अॅग्रोने कारखाना घेतला.”
“नाबार्डच्या अहवालात १०० जणांची नावं होती, माझं नाव तिथे नव्हतं. सुरुवातीला ईडीच्या गुन्ह्यातही माझं नाव नव्हतं. नंतर ते मुद्दाम घेतलं गेलं,” असा आरोप त्यांनी केला.
पक्षात नेतृत्व बदलाची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याध्यक्षपदाबाबत चर्चेत असलेल्या रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, “मी कधीही राज्याध्यक्षपद मागितलं नाही. कुणालाही संधी द्यावी. जयंत पाटील यांचं मार्गदर्शन राष्ट्रीय स्तरावरही महत्वाचं आहे. मी, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सर्वजण पक्षात आवश्यक बदल व्हावेत असं मानतो.”
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवरही रोहित पवार यांनी फेटाळून लावलं. “जयंत पाटील हे घाबरणाऱ्यांपैकी नाहीत. ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांच्याबाबतची अफवा पसरवली जात आहे,” असं ते म्हणाले.
नवीन राज्याध्यक्ष १५ जुलैपर्यंत?
“आम्ही चार नावं सुचवली आहेत. १५ जुलैपर्यंत नवीन राज्याध्यक्षाचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. मला कोणतंही छोटं पद मिळालं तरी मी काम करत राहील,” असंही रोहित पवार यांनी सांगितले.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार