पुणे, १४ जुलै २०२५: सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आणि फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोहीम रायरेश्वराची’ हा ऐतिहासिक उपक्रम रविवारी यशस्वीरित्या पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या पवित्र रायरेश्वर गडावर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तब्बल ६३५ उत्साही सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मोहिमेदरम्यान रायरेश्वराच्या कुशीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांच्या मनात शिवप्रेम अधिकच जागृत झाले. रायरेश्वरावरील ऐतिहासिक मंदिरे, रमणीय निसर्गसौंदर्य आणि शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास यांचा अनुभव घेताना सहभागी भारावून गेले. यावेळी स्वच्छता मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामागील उद्देश फक्त ट्रेकिंगपुरता मर्यादित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा होता. “इतिहास फक्त पुस्तकांत वाचायचा नसतो, तो अनुभवायचाही असतो,” असे आयोजकांनी नमूद केले.
ही मोहीम म्हणजे सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आणि फोर्ट फिट मुव्हमेंटच्या गडकिल्ले मोहिमांच्या मालिकेतील पहिले पाऊल होते. आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इतर किल्ल्यांवरही अशा मोहिमा राबवण्याचे नियोजन आहे.
सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे म्हणाले, “गडकिल्ले हे महाराष्ट्राचे खरे वैभव आहेत आणि या वैभवाचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. शिवरायांनी दिलेल्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्यासाठीच या उपक्रमांची सुरुवात झाली आहे.”
मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या भूमीत उभं राहताच एक वेगळीच ऊर्जा मिळते. आपला इतिहास म्हणजे आपला अभिमान आहे. सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंटचा हा उपक्रम स्तुत्य असून, यामुळे आपण पुन्हा आपल्या मुळांशी जोडले जात आहोत.”
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार