कल्याणीनगर, १५ जुलै २०२५ : पुण्यातील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आज एक महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय देण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीला प्रौढांप्रमाणे वागणूक द्यावी, असा पुणे पोलिसांचा अर्ज बाल न्यायालयाने फेटाळला आहे.
ही घटना १९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली होती. पोर्शे गाडीने दोन तरुणांना जोरदार धडक दिली होती, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
या प्रकरणात आरोपी विधी संघर्षित बालक (किशोरवयीन) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, संपूर्ण तपास बाल न्यायालयाच्या अखत्यारित करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपीवर प्रौढांप्रमाणे खटला चालवण्यात यावा, अशी मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सरकारी वकील शिशिर हिरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असून, आरोपीच्या वागणुकीने प्रौढपणाचे स्पष्ट संकेत मिळतात. त्यामुळे या खटल्याची सुनावणी प्रौढांप्रमाणे व्हावी, अशी आमची भूमिका होती.” मात्र आज बाल न्यायालयाने निकाल देताना असा निष्कर्ष काढला की, हा खटला प्रौढांप्रमाणे चालवण्यास पात्र नाही, आणि त्यामुळे पोलिसांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
“न्यायालयाचा संपूर्ण निकाल अद्याप वाचण्यात आलेला नाही. वरिष्ठ न्यायालयात दाद मागायची की नाही, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.” असेही त्यांनी स्पष्ट केले.

More Stories
निवडणुकीआधी भाजपचा मेगा स्ट्राईक! पुणे–पिंपरीत २२ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादी–उबाठा–काँग्रेसला मोठा धक्का
‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’ – मुरलीधर मोहोळ
पुणे ः अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त