October 19, 2025

ढोल ताशा पथकांना महानगरपालिकेने सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी -धीरज घाटे

पुणे, १६ जुलै २०२५: महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला आणि सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशा पथके लयबद्ध पद्धतीने वाद्यवादन करून आपली सेवा गणरायाच्या चरणी रुजू करतात. पुण्यातील विविध ढोल-ताशा पथकांमधील वाद्यवादन उत्सवप्रेमी नागरिकांना मनापासून आवडते. या पथकांसाठी गणेशोत्सवापूर्वीचा सराव हा फार महत्त्वाचा असतो. आज पुण्यातील मध्यभागामध्ये अनेक ढोल-ताशा पथकांना सरावासाठी आवश्यक मैदाने उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांची भेट घेतली.

पुण्याच्या मध्य भागातील महापालिकेच्या ताब्यात असलेली मैदाने तात्पुरत्या स्वरुपात ढोल-ताशा पथकांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करणारे पत्र आयुक्तांना देण्यात आले. गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालेला आहे. असे असताना पारंपरिक ढोल-ताशा पथकांना सरावासाठी मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत. सरावामुळेच ही पथके गणेशोत्सवात तालबद्ध पद्धतीने वादन करू शकतात. विविध पथकांना सध्या सराव कुठे करायचा, हा प्रश्न भेडसावतो आहे. त्यामुळे महापालिकेची मैदाने पथकांना तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी राज्यातील भाजपा-महायुतीचे सरकार कायमच पुढाकार घेते. त्यात यंदापासून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. असे असताना ढोल-ताशा पथकांना सरावासाठी मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत, अशीच आमची भूमिका आहे.

महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतली असून, महापालिकेच्या ताब्यातील मैदाने सराव पथकांना देण्यात यावीत, अशा सूचना पालिकेच्या मालमत्ता विभाग आणि क्रीडा विभागाला दिल्या आहेत. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवही जल्लोषात साजरा होईल.
शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समवेत माजी नगरसेवक अजय खेडेकर, बापू मानकर, रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी,सुनील पांडे, राजू परदेशी तसेच ढोल ताशा महासंघाचे ऍड अनिश पाडेकर व केतन देशपांडे उपस्थित होते.