पुणे,१६ जुलै २०२५: रिंगरोडसाठी लागणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेसाठी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, याची प्रथम प्राधान्याने काळजी घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले. बुधवारी (दि.१६) ग.दि. माडगूळकर सभागृहात प्रस्तावित अंतर्गत ६५ मीटर रुंद रिंगरोडसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे, त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
शेतकऱ्यांचे हक्क आणि अधिकारांचा प्रथम विचार करून भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली तर त्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला शासनाकडून मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या रिंगरोडमुळे बहुतांश गावे मुख्य रस्त्यांशी जोडली जाणार असल्याने दळणवळणाच्या अधिक सोयी – सुविधा उपलब्ध होतील. यासह भूसंपादनानंतर शेतकऱ्यांकडे शिल्लक राहणाऱ्या जमिनीचे महत्वदेखील पूर्वीपेक्षा अधिक वाढणार असल्याचे यावेळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी सांगितले.
थेट खरेदी, संमतीने खरेदी, टीडीआर आणि इन्सेटिव्ह एफएसआय आदीबाबत शेतकऱ्यांना यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत रिंग रोड टप्पा एक आणि टप्पा दोन यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रिनाज पठाण, भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, सह आयुक्त हिम्मत खराडे, अधीक्षक अभियंता प्रभाकर वसईकर, भूमिअभिलेख विभागाच्या अधिक्षक आशा जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना भूसंपादनाची प्रक्रिया समजावी, या उद्देशाने बुधवारी पीएमआरडीएतर्फे संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यासह भूसंपादन प्रक्रिया कशी राबवली जाते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
रिंगरोडसाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या वडगाव शिंदे, निरगुडी, आंबेगाव खुर्द, जांभळवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, येवलेवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, कदमवाकवस्ती (ता. हवेली), सोळू (ता. खेड) या गावातील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार