September 11, 2025

सह्याद्री हॉस्पिटलच्या जागेच्या हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह; पुणे मनपाने स्पष्टीकरण मागवले

पुणे, १६ जुलै २०२५: सह्याद्री हॉस्पिटलच्या जागेच्या हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे पेठ एरंडवणा, फायनल प्लॉट क्र. ३० येथील १९७६ चौ.मी. क्षेत्रासंदर्भात पुणे महानगरपालिका (PMC) आणि कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्यातील भाडेपट्ट्याच्या करारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ही जागा मणिपाल ग्रुपला हस्तांतरित केल्याची चर्चा सुरू असून, या पार्श्वभूमीवर मनपाने ट्रस्टकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

३० सप्टेंबर २००६ रोजी कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने सह्याद्री हॉस्पिटलसोबत एक सामंजस्य करार केला होता. ५३,३५,२०० रुपये प्रीमियम आणि प्रतिवर्षी १ रुपया भाडे या अटींवर ही जागा ९९ वर्षांच्या कालावधीसाठी ट्रस्टला भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. याबाबतचा करारनामा २७ फेब्रुवारी १९९८ रोजी नोंदणीकृत असून, तो दोन्ही पक्षांना बंधनकारक आहे. सह्याद्री हॉस्पिटलने ही जागा मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुपला हस्तांतरित केल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

मूळ भाडेकरारातील अट क्र. ८ नुसार, ट्रस्टने जागा किंवा त्यावर उभारण्यात आलेल्या इमारतीचा कोणताही भाग अन्य कोणासही भाड्याने, पोटभाड्याने अथवा अन्य कोणत्याही स्वरूपात देण्यास मनाई आहे. मात्र, हॉस्पिटलच्या कार्यासाठी आवश्यक सेवा-सुविधा पुरवण्यासाठी संस्थांशी करार करण्याची मुभा आहे.

अट क्र. ९ मध्ये नमूद आहे की, ही जागा गहाण, दान, बक्षीस किंवा इतर कोणत्याही स्वरूपात हस्तांतरित करता येणार नाही. मात्र, बांधकामासाठी ती बँक अथवा वित्त संस्थेकडे गहाण ठेवण्याची गरज असल्यास, त्यासाठी महापालिका आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.

या प्रकरणी स्पष्टता मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ट्रस्टकडून पुढील सात दिवसांत खालील कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत:

१. कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट आणि सह्याद्री हॉस्पिटल, तसेच सह्याद्री हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप यांच्यातील करारांची प्रत.
२. जागा गहाण ठेवली असल्यास, त्या संदर्भातील कागदपत्रे.
३. गहाण ठेवण्यास महापालिकेची परवानगी घेतली असल्यास, तिची छायांकित प्रत.
४. संपूर्ण प्रीमियम रक्कम PMC च्या कोषागारात भरल्याचे पुरावे.

या प्रकारामुळे संबंधित भूखंडाच्या वापरासंबंधी कायदेशीर पेच निर्माण झाला असून, महापालिकेच्या पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.