September 11, 2025

पुणे: कॅब बंदला रिक्षा चालकांचीही साथ; सरकारला अल्टिमेटम, मागण्या मान्य न झाल्यास बंद तीव्र करण्याचा इशारा

पुणे, १७ जुलै २०२५: ओला, उबेर, रॅपिडो सारख्या अ‍ॅप आधारित सेवांच्या मनमानी दरवाढीविरोधात कॅब चालकांनी पुकारलेल्या बंदला आता रिक्षा चालकांचीही साथ मिळाली आहे. आजपासून (१७ जुलै) रिक्षाचालकदेखील या आंदोलनात सहभागी झाले असून, मागण्या मान्य होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या बंदामुळे पुणे, मुंबई आणि नागपूरसह अनेक शहरांतील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ओला,उबेर व रॅपिडो हे अवैधरीत्या व्यवसाय करीत असून, त्यांच्या बेकायदेशीर स्पर्धेमुळे पारंपरिक रिक्षा व कॅब चालकांचे आयुष्य संकटात सापडले आहे. कालच एका कॅब चालकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, त्यामागील प्रमुख कारण म्हणून व्यावसायिक अडचणींचा उल्लेख केला जात आहे.

डॉ. क्षीरसागर म्हणाले, “१५ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनादरम्यान परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आमच्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.”

ते पुढे म्हणाले की, बाईक टॅक्सी सुरू केल्यास पारंपरिक चालकांवर बेरोजगारीचं संकट ओढवेल. सरकारने ई-बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या हालचाली थांबवाव्यात, अन्यथा अधिक मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेले दर सर्वच रिक्षा व कॅब सेवांना लागू व्हावेत, अशा मागणीसह पुढील मुद्देही समोर आले आहेत:

– दर ठरवताना SUV प्रवासी वाहनांसाठी वेगळे दर निश्चित करावेत
– प्रवाशांच्या किरकोळ तक्रारींवरून चालकांच्या ID ब्लॉक करू नयेत
– ओपन परमिट धोरण रद्द करून कॅब व रिक्षा परमिटवर मर्यादा घालाव्यात
– ट्रॅफिकच्या समस्येमुळे नवीन परवान्यांवर बंदी घालावी

डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले की, मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील. दरम्यान, उद्या पुन्हा एकदा आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.