सहकारनगर, १८ जुलै २०२५ः पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री एका सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर हल्ला करून थेट पोलिस स्टेशनमध्येच तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने पोलिस दलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपी ऋषिकेश उर्फ बारक्या लोंढे (रा. तळजाई वसाहत, सहकारनगर) याच्यावर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल होता. काल रात्री ३ वाजता सहकारनगर पोलिसांनी त्याला अटक केली असता, त्याने पोलिस स्टेशनमध्येच जोरदार तोडफोड केली. काचा फोडल्या, आणि स्वतःला गंभीर इजा करून घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश लोंढे आणि त्याचा भाऊ जितेंद्र लोंढे हे दोघेही घरात नशेच्या अवस्थेत होते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांवर मिरचीचा स्प्रे वापरला, त्यामुळे दोन पोलिस जखमी झाले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत ऋषिकेशला अटक केली आणि पोलिस स्टेशनमध्ये आणले.
अटक करून त्याला बेड्या घातल्यानंतरही, ऋषिकेशने अचानक पोलिस स्टेशनमध्ये काचा फोडल्या, फर्निचरची तोडफोड केली आणि स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी पोलिसांवरही ससूनमध्येच उपचार सुरू आहेत.
या घटनेने पुणे शहरातील पोलिस दलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. पोलिस स्टेशनमध्येच गुन्हेगार अशी दहशत माजवत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सराईत गुन्हेगार पोलिस स्टेशनमध्येच पोलिसांवर हल्ला करतो, तोडफोड करतो, आत्महत्येचा प्रयत्न करतो, हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.
या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले, “गुन्हेगाराने अटक केल्यानंतरही हिंसक वर्तन करत पोलिस स्टेशनमध्ये तोडफोड केली. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत.”
“पोलिस स्टेशनमध्ये अशी घटना घडणे अत्यंत गंभीर आहे. या घटनेची दखल घेतली असून यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून सीसीटीव्ही आणि अन्य पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार