पुणे , २१ जुलै २०२५ः पुण्यातील कसबा मतदारसंघात सुरु असलेल्या “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” मिशन अंतर्गत शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. २२ ठिकाणी उभारलेल्या ३डी शिल्पकृतींच्या अनावरणाचा कार्यक्रम नागनाथ पार चौकात पार पडला. यावेळी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार हेमंत रासने आणि शहरातील वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या राजमुद्रांचे भव्य शिल्प अनावरण करण्यात आले. एकूण २२ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ३डी शिल्पांद्वारे पूर्वी अस्वच्छ व कचरामय ठिकाणांचा पूर्ण कायापालट करण्यात आला असून, त्या जागा आता शिस्तबद्ध, आकर्षक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध स्वरूपात तयार करण्यात आल्या आहेत.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, “कसब्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी घेतलेली ही पुढाकाराची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. फ्लेक्समुक्त शहर व स्वच्छ पुण्याच्या दिशेने हे एक ठोस पाऊल आहे.”
मिसाळ यांनी आमदार रासने यांचे अभिनंदन करताना, “कसब्याचं वैभव परत आणण्यासाठी त्यांनी घेतलेलं हे पहिलं पाऊल असून, नगरविकास मंत्री म्हणून त्यांच्या या अभियानाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे,” असे सांगितले.
यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, “कसबा हा केवळ मतदारसंघ नाही, तर पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचा केंद्रबिंदू आहे. फक्त कचऱ्याच्या जागा बदलण्यापेक्षा आपण नागरिकांची मानसिकताही बदलत आहोत. येत्या काळात कसबा स्वच्छतेचं आणि सौंदर्यीकरणाचं रोल मॉडेल बनेल.”
महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही या उपक्रमाचे समर्थन करताना, “अशा कल्पक उपक्रमांद्वारे शहराचं रूप पालटता येईल. कसब्यासह संपूर्ण पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिका कटीबद्ध आहे,” असे स्पष्ट केले.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “हा उपक्रम शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. गणेशोत्सव निर्बंधमुक्त असेल, त्यामुळे नागरिक आणि गणेश मंडळांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाला अनधिकृतरित्या रस्त्यावर पडलेली वाहने हटवण्याचे आदेश दिले आहेत.”
या कार्यक्रमात झोन १ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, घनकचरा उपायुक्त संदीप कदम, मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे, तसेच अनेक माजी नगरसेवक, आदी उपस्थित होते.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार