September 11, 2025

Pune: विसर्जनासाठी ‘वन विंडो योजना’, महिलांसाठी स्वच्छतागृहे – गणेश मंडळांची प्रशासनाकडे ठोस मागणी

पुणे, २१ जुलै २०२५ – पुण्यातील गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात आज पुणे महापालिकेत एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले, महापालिका अधिकारी आणि शहरातील विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विसर्जन मिरवणुकीसाठी ‘एक खिडकी योजना’ (वन विंडो) राबवावी, प्रत्येक चौकात महिला भाविकांसाठी सुलभ शौचालयांची उभारणी करावी, गणेश विसर्जनासाठी नवीन घाटांची निर्मिती करावी, अशा काही महत्त्वाच्या मागण्या गणेश मंडळांच्या वतीने करण्यात आल्या.

याशिवाय, मानाच्या गणपतींची मिरवणूक संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पूर्ण करावी, कंबरेला कोयते लावून येणाऱ्या तरुण टोळ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावे, मेट्रो स्थानकांजवळ स्टेज न उभारता मोकळ्या जागांमध्ये बसण्याची व्यवस्था करावी, अशा सुचना मांडण्यात आल्या.
A
महापालिकेच्या निधीचा योग्य वापर व्हावा, जाहिरातीसाठी परवानगी मिळावी, मात्र गणेशोत्सवाचा जाहिरात हेतूने गैरवापर होऊ नये, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखावीत, अशी भूमिका काही मंडळांनी मांडली. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी एफसी रोड मार्ग खुला ठेवण्याची परवानगी मागण्यात आली. तसेच भिडे पुलाचे काम वेळेत न झाल्याने होणाऱ्या वाहतूककोंडीसंदर्भात पालिकेने लक्ष घालावे, अशी मागणीही झाली.

गणेश विसर्जनासाठी दरवर्षी एकाच ठिकाणी घाट न उभारता नव्या ठिकाणी घाट उभा करावा, मंडळांना पालिकेकडून एकच नारळ दिला जातो, हे अपुरे असल्याचं मंडळांचं म्हणणं होतं. ‘एक मंडळ – एक पथक’ अशी स्पष्ट व सुसंगत रचना करावी आणि सर्व मंडळांना एकसमान वागणूक द्यावी, असा आग्रह काही प्रतिनिधींनी धरला.

बैठकीनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे. उत्सव काळात आरोग्य, मंडप, होर्डिंग्ज, सीसीटीव्ही, पथदिवे आदी सर्व गोष्टींचे योग्य नियोजन केले जाईल.” त्यांनी खड्डे बुजवणे आणि आवाज मर्यादेच्या बाबतीत सूचना देण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले म्हणाले, “मी नुकतीच जबाबदारी स्वीकारली आहे. गणेशोत्सव काळात कुठलेही विघ्न येणार नाही, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून सर्व गणेश मंडळांना पोलिसांकडून सहकार्य दिलं जाईल.”

हिंदी बोलण्यावरून वादंग
गणेशोत्सव तयारीच्या बैठकीमध्ये एका कार्यकर्त्यांनी हिंदीमध्ये त्याचे मनोगत व्यक्त केले त्यावेळी अन्य गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी मराठी मधून बोल असा आग्रह करत वाद सुरू केला. पण संबंधित कार्यकर्ता हिंदीतच भाषण करत असल्याने या वादामध्ये आणखीन भर पडली. अखेर मराठीतून बोलण्याच्या मान्य केल्यानंतर हा वाद थांबला. दरम्यान राज्यभरात हिंदी विरूद्ध मराठी असावाद सुरू असताना त्याचे पडसाद महापालिकेच्या या बैठकीत उमटले.