पुणे, २१ जुलै २०२५: महाराष्ट्रातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतांची पुन्हा मोजणी २५ जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत भोसरी येथील गोदामात होणार आहे. ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या याचिकेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक मतदारसंघांमध्ये मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवण्यात आले होते. हडपसर मतदारसंघातही मतांची घोटाळा झाल्याचा आरोप करत जगताप यांनी पुन्हा मोजणीची मागणी केली होती.
यावर निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील २७ ईव्हीएम व VVPAT मशिन्सची पुन्हा मोजणी करण्यास परवानगी दिली होती. मात्र, ही मोजणी प्रत्यक्ष मतदानाऐवजी मॉक पोलच्या आधारावर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या निर्णयाला विरोध करत जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाने आता प्रत्यक्ष मतदान झालेल्या मतांचीच मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे हडपसरमधील मतमोजणी प्रक्रियेला नवीन वळण मिळाले असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष मते मोजली जाणार आहेत.
या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले असून, “हडपसरमधील मतांची चोरी आता जगासमोर येणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार