September 11, 2025

Pune: सांडपाणी प्रकल्पांना गती; १६ गावांसाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर

पुणे, २२ जुलै २०२५ : महापालिकेत समाविष्ट केलेल्या २३ गावांपैकी १६ गावांतील सांडपाणी वाहिन्या व प्रक्रिया प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेतून ५३३ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित सात गावांसाठी ८५६ कोटी ९१ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार असून तो सध्या तांत्रिक मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, २३ गावांतील सांडपाणी व्यवस्थेसाठी सुमारे ४७१ किमी जोडवाहिन्या, ९०.५ किमी मुख्यवाहिन्या आणि १२ एसटीपी उभारण्यात येणार आहेत. यासाठी एकूण १,४३७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १६ गावांतील प्रकल्पांना मंजुरी दिली. आज नगरविकास विभागाच्या तांत्रिक समितीने त्यावर अंतिम मोहोर उमटवली. लवकरच यासंबंधी शासन आदेश जारी होणार आहेत.

मंजुरी मिळालेली गावे: सूस, म्हाळुंगे, नर्‍हे, पिसोळी, सणसनगर, कोंढवे धावडे, किरकिटवाडी, नांदोशी, खडकवासला, न्यू कोपरे, नांदेड, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी.

प्रस्तावित प्रकल्प: बावधन, औताडेवाडी-हांडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी, वाघोली, शेवाळेवाडी, मांजरी बु.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवशी ही मंजुरी मिळाल्याने, याला वाढदिवसाचे ‘गिफ्ट’ मानले जात आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामागे राजकीय डावपेच असल्याचीही चर्चा आहे.