पुणे, २४ जुलै २०२५: पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, यामधील २९ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना जोडणारी ही मेट्रो व्यवस्था आता शहरातील महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सेवा बनत चालली आहे. दररोज सुमारे १ लाख ९० हजारांहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करत असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात लक्षात घेता, पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी खास सवलत योजना जाहीर केली आहे. दिनांक २५ जुलै २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत, पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वन पुणे विद्यार्थी पास कार्ड’ पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. याआधी रु. १०० + १८ (जीएसटी) = रु. ११८ इतक्या किमतीत मिळणारे हे कार्ड आता मोफत देण्यात येणार आहे. मात्र, कार्ड घेताना किमान रू २०० टॉप-अप करणे अनिवार्य असून, हे संपूर्ण रक्कम प्रवासासाठी वापरता येईल. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोमधील दररोजच्या प्रवासावर ३०% सवलत मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक किफायतशीर आणि आरामदायक ठरणार आहे. तसेच, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळेल.
या उपक्रमाविषयी बोलताना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर म्हणाले, “विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर करत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी मेट्रोचा लाभ घ्यावा, यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. मेट्रो मार्गावरील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.”
ऑफरचे तपशील पुढीलप्रमाणे:
– कालावधी: २५ जुलै २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५
– पात्रता: पदवीपर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी (KYC पडताळणी आवश्यक)
– १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या नावावर पास कार्ड मिळणार (पालकांची KYC आवश्यक)
– कार्ड मूल्य: ₹०/- (मोफत)
– किमान टॉप-अप: ₹२००/- (पूर्ण रक्कम प्रवासासाठी वापरण्यायोग्य)
पुणे मेट्रोने सर्व पात्र विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
More Stories
Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल