पुणे, २४ जुलै २०२५: लोहगाव येथे उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या ऑक्टोबर अखेरीस हे रुग्णालय सुरू करण्याचा वडगाव शेरी आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला आहे.
या अनुषंगाने त्यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे रुग्णालयाची क्षमता १०० खाटांवरून २०० खाटांपर्यंत वाढविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
बापूसाहेब पठारे हे २०१३ पासून या रुग्णालयासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, रुग्णालयाची प्रशासकीय मंजुरी मिळविण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. ससून रुग्णालयावरील ताण कमी करून परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने हे रुग्णालय उभारण्यात येत आहे.
पावसाळी अधिवेशनातही पठारे यांनी यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे मुद्दा उपस्थित केला होता. यावर आरोग्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुढील निर्णयासाठी मागणी पाठविल्याचे सांगितले होते.
लोहगाव परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व शेजारच्या जिल्ह्यांमधून तसेच इतर राज्यांतून आलेले अनेक नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्या दृष्टीने खासगी रुग्णालयांत उपचार घेणे खर्चिक ठरत असल्याने हे सरकारी रुग्णालय अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
सध्या या भागात अंतर्गत व बाह्य रिंगरोडचे कामही सुरू आहे. त्यामुळे भविष्यात लोहगावचा वेगाने विकास होणार असून, त्या पार्श्वभूमीवर १०० खाटांची सध्याची क्षमता अपुरी पडू शकते. भविष्यात नव्याने जागा उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्यानेच सध्या उपलब्ध असलेल्या इमारतीतच २०० खाटांची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी स्पष्ट केले. त्यांनी या विषयासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
More Stories
Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल