पुणे, २४ जुलै २०२५: पुणेकरांना सकाळी शहर स्वच्छ दिसावे यासाठी महानगर पालिकेमार्फत रात्री स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ड्यूटी लावून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत रोज २०० ते २५० मेट्रिक टन उचलला जातो. या मोहिमेचे पुणेकरांनी स्वागत केले असले तरी रात्री कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याने मिश्र कचऱ्याचे प्रमाण तब्बल १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे ही मोहीम चांगली असली तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मात्र, डोकेदुखी वाढणार आहे.
पुण्यात स्वच्छता योग्य प्रकारे होत नसल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी रात्रीच रस्त्यावरील कचरा उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घनकचरा विभागाने आयुक्तांच्या सूचनेनुसार रात्रीतूनच शहर स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या साठी १४७२ कर्मचाऱ्यांची रात्रीची ड्यूटी देखील लावण्यात आली तसेच कचरा उचलण्यासाठी २१३ वाहनांची देखील मदत घेतली जात आहे. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत रोज २०० ते २५० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. मात्र, या कचऱ्यात मिश्र कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी दिली. हे प्रमाण तब्बल १५ ते २० टक्के असल्याचे देखील त्यांनी सांगितले. पहाटे कचरा गोळा करून तो रॅम्पवर नेला जातो. या कचऱ्याचे विलगीकरण येथे केले जाते. मात्र, ही यंत्रणा रात्री बंद असल्याने रात्री गोळा केलेल्या कचऱ्याचे योग्य पद्धतीने विलगीकरण होत नाही. त्यामुळे मिश्र कचऱ्याची समस्या वाढली असल्याचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी म्हणाले.
पुण्यात जागो जागी कचरा पडून राहत असल्याने अनेक नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. आयुक्त नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यावर शहर स्वच्छतेला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच दिवसा योग्य प्रकारे स्वच्छता होत नसल्याने रात्री कर्मचाऱ्यांकडून शहर स्वच्छ करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार शहरात रात्री ९ ते पहाटे ६ व सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत अशा दोन टप्प्यात कचरा गोळा केला जातो.
“महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यामार्फत रात्री कचरा उचलला जातो. या कचऱ्यात ओला आणि सुका अशा मिश्र कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्वच्छता विभागाचे तब्बल ३० टक्के कर्मचारी रात्री परिसर स्वच्छ करतात. मिश्र कचऱ्या सोबतच रात्री शहर स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. गेल्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत, ही बाब चिंताजनक आहे.” – पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महानगर पालिका
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार