पुणे, २९ जुलै २०२५: ‘स्पर्धेपूर्वीचा क्ले कोर्टवरील उत्तम सराव आणि स्पर्धेत दडपण न घेता खेळल्याचा फायदा झाला,’ अशी भावना पुण्याची टेनिसपटू वैष्णवी आडकरने व्यक्त केली. २० वर्षीय वैष्णवीने जर्मनी येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील टेनिसमधील महिला एकेरीत ब्राँझपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला टेनिसपटू ठरली.
या निमित्ताने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेकडून (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने वैष्णवी आडकरचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. तिला २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक नंदन बाळ, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, वैष्णवीचे वडील निहार आडकर उपस्थित होते.
वैष्णवीला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्लोवाकियाच्या एसझ्तर मेरीकडून ६-२, ४-६, ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी १९७९मध्ये मेक्सिको सिटीत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत नंदन बाळ यांनी पुरुष एकेरीत रौप्यपदक मिळवले होते. सत्काराला उत्तर देताना वैष्णवी म्हणाली, ‘या स्पर्धेची निवड चाचणी भुवनेश्वर येथे झाली. यानंतर मला काही क्ले कोर्टमधील स्पर्धेत खेळता आले. विद्यापीठ स्पर्धा क्ले कोर्टवरच होती. त्यामुळे या स्पर्धांमध्ये खेळून उत्तम तयारी झाली. ही स्पर्धा आव्हानात्मक असेल, असे वाटले नव्हते. मात्र, युरोपातील टेनिस क्रमवारीतील अव्वल ३००, ४००मधील खेळाडू सहभागी झाले होते. त्यात अमेरिकन विद्यापीठाकडून खेळणारे खेळाडूही होते. मात्र, मिळालेल्या संधीचे सोने करायचे, एवढेच माझ्या डोक्यात होते. दडपण न घेता खेळ केल्याचा फायदा झाला.’
वैष्णवी बीएमसीसी कॉलेजमध्ये शिकत असून, तिने या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. ती सध्या बाउन्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. यावेळी वैष्णवी म्हणाली की, ‘पदक मिळाल्याचे समाधान नक्कीच आहे. कारण, स्पर्धेपूर्वी मी पदकाचा विचारच केला नव्हता. मला माझा नैसर्गिक खेळ करायचा होता. यासाठी पाच लढती खेळले. हा अनुभव समृद्ध करणारा होता. आता आगामी फेड कप टेनिस स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळविण्याचे माझे लक्ष्य आहे. झालेल्या चुकांबाबत प्रशिक्षकांशी चर्चा झाली असून, त्यात नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार.’
या वेळी बोलताना नंदन बाळ म्हणाले, ‘वैष्णवीच्या पदकामुळे माझे मागील यशही प्रकाशझोतात आले. त्यामुळे खरे तर मी तिचे आभार मानले पाहिजे. मात्र, विद्यापीठ स्पर्धांमध्ये खेळणे सोपे नसते. युरोप आणि अमेरिका विद्यापीठातील अनेक चांगले खेळाडू येथे कौशल्य पणाला लावत असतात. या स्पर्धेत टेनिसमधील आव्हान तर अधिक असते. त्यामुळे वैष्णवीचे यश हे आपल्यासाठी संस्मरणीय आहे. तिची कामगिरी कौतुकास्पद आहे.’
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, ‘वैष्णवीमध्ये गुणवत्ता आहे. त्यामुळेच तिला लक्ष्य या संस्थेने पाठिंबा दिला. पुणे आणि राज्य टेनिस संघटनेकडून तिला काही कमी पडू देणार नाहीत. भविष्यात तिला आणखी मोठ्या स्पर्धा गाजवायच्या आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचेही तिने लक्ष्य वेधून घेतले आहेत.’
पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, ‘पुणेकर आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. ज्युनिअरपासून तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर एक-एक टप्पा पार केला आहे. तिचे भविष्य उज्ज्वल आहे.’
तिचे वडील निहार आडकर म्हणाले, ‘वैष्णवीने पहिला सेट जिंकला तेव्हा मला मोठा आनंद झाला होता. तिने उपांत्य फेरीत चांगला लढा दिला. त्यामुळे तिच्या पराभवाचे दु:ख नाही. तिच्या मेहनतीचे फळ मिळाले. आमच्यासाठी हा क्षण अभिमानाचा आहे. तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.’
More Stories
24व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेस (24 ऑक्टोबर)पासून सुरुवात
दुसऱ्या ‘एम्पॉवर हर फाउंडेशन’एआयटीए-एमएसएलटीए १ लाख रकमेची अखिल भारतीय मानांकन महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत सोनल पाटील हिला विजेतेपद
दुसऱ्या ‘एम्पॉवर हर फाउंडेशन’एआयटीए-एमएसएलटीए १ लाख रकमेची अखिल भारतीय मानांकन महिला टेनिस स्पर्धेत सोनल पाटील, डेनिका फर्नांडो यांचा अंतिम फेरीत प्रवेश