September 11, 2025

पुणे: २ वर्षाच्या मुलीची अपहरणातून सुखरूप सुटका; भीक मागण्यासाठी केलेल्या टोळीचा पर्दाफाश

पुणे, २९ जुलै २०२५ – भीक मागण्यासाठी अपहरण करण्यात आलेल्या २ वर्षांच्या चिमुरडीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट २, पुणे यांनी संयुक्तपणे केली. धाराशीव जिल्ह्यातून मुलीची सुटका करण्यात आली असून पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही घटना दिनांक २५ जुलै २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते २६ जुलै रोजी १.३० च्या सुमारास घडली. वंडर सिटी झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, कात्रज, पुणे येथून झोपेतून एक अज्ञात व्यक्ती फिर्यादींची दोन वर्षांची मुलगी उचलून घेऊन पळून गेला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३५३/२०२५, भा.दं.वि. कलम ३६३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे शहर पोलीस आयुक्तांनी तत्काळ कारवाईसाठी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली. त्यांनी कात्रज ते पुणे रेल्वे स्टेशनदरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये दोन पुरुष आणि एक महिला दुचाकीवरून मुलीला रेल्वे स्टेशनकडे नेताना दिसून आले.

पुणे रेल्वे स्टेशन सीसीटीव्ही तपासणीदरम्यान आणखी दोन आरोपींचा सहभाग उघडकीस आला. आरोपींची ओळख पटवल्यानंतर तपास पथकांना माहिती मिळाली की आरोपी तुळजापूर, जि. धाराशीव येथे आहेत. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोकाशी, सपोनि आशिष कवठेकर, तसेच गुन्हे शाखा युनिट २ चे पथक तुळजापूर येथे रवाना झाले.

स्थानिक धाराशीव एलसीबी पोलिसांच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा लावून खालील आरोपींना अटक करण्यात आली:
सुनिल सिताराम भोसले (५१), रा. मोतीझारा, तुळजापूर

शंकर उजन्या पवार (५०), रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापूर
, शालुबाई प्रकाश काळे (४५), रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापूर
, गणेश बाबु पवार (३५), रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापूर
, मंगल हरफुल काळे (१९), रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी, पुणे
. तपासादरम्यान मुलगी आरोपींच्या ताब्यातून सुखरूप सापडली. आरोपींनी मुलीचे अपहरण भीक मागण्यासाठी केल्याची कबुली दिली आहे.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईमध्ये योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये राहुल खिलारे, जितेंद्र कदम, कुमार घाटगे, अंजुम बागवान, अशिष कवठेकर, अमोल रसाळ, वैभव मगदुम, स्वप्नील पाटील, निलेश मोकाशी यांच्यासह विविध पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. या शिताफीने आणि सहकार्याने पार पडलेल्या कारवाईमुळे एका चिमुकलीचे आयुष्य वाचले असून पोलिसांचे कौतुक सर्वत्र होत आहे.