पुणे, २९ जुलै २०२५: महापालिकेच्या शाळा, क्रीडांगणे, दवाखाने, नाट्यगृह, प्रकल्पबाधितांच्या सदनिका अशा अनेक मिळकतींवर सुरक्षा रक्षकांचा अभाव असून त्यामुळे चोरी, अतिक्रमण, मद्यपान, तोडफोड यांसारखे प्रकार सर्रास घडत आहेत. मिळकतींच्या सुरक्षेकडे महापालिका प्रशासनाचे भीषण दुर्लक्ष झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची गंभीर स्थिती आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारती, काही क्षेत्रीय कार्यालये वगळता बहुतांश मिळकतींवर सुरक्षा रक्षक उपलब्ध नाहीत. बीएसयुपी, एसआरए प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांमधून पाण्याचे नळ, वीज तारा आणि इतर साहित्य चोरी जाते. काही ठिकाणी तर बेकायदा अतिक्रमणही झाले आहे. चंदन वृक्ष असलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कचरा डेपो व व्हेईकल डेपो येथेही चोरी, दमदाटी, मारहाण व हल्ल्यांचे प्रकार नित्याचे झाले आहेत.
शहरातील नाट्यगृहे, क्रीडांगणे, उद्याने, रुग्णालये, मंडई तसेच समाविष्ट गावांतील स्मशानभूमी, दवाखाने, शाळा, पाण्याच्या टाक्या या ठिकाणीही सुरक्षेचा मागमूस नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी मद्यपी, टवाळखोरांचा वावर वाढला असून गैरप्रकारांमुळे गंभीर घटनांची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेच्या विविध विभागांनी सुरक्षा रक्षकांची मागणी केली असून ती पुढीलप्रमाणे आहे :
प्राथमिक शाळा – ३६
विद्यार्थी वाहतूक बस – ६०
स्मशानभूमी – ३७
उद्याने – ९२
आरोग्य विभाग – ७०
क्रीडांगणे – २५
नाट्यगृहे – ७१
पाण्याच्या टाक्या/एसटीपी – ९५
भाजी मंडई – ३०
“विभागांनी मागणी केल्यानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.” – राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, महापालिका
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार