पुणे, २९ जुलै २०२५: गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (जीआयपीई), पुणे या देशातील अग्रगण्य संशोधन संस्थेत प्रा. डॉ. उमाकांत दाश यांनी आज कुलगुरूपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. या वेळी संस्थेचे माजी कुलगुरू प्रा. शंकर दास उपस्थित होते. त्यांनी औपचारिकरित्या नवे कुलगुरू डॉ. दाश यांच्याकडे पदभार सोपवला. संस्थेच्या वतीने प्रा. शंकर दास यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
डॉ. उमाकांत दाश हे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन आणि धोरणनिर्मिती क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव असलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आहेत. कुलगुरूपद स्वीकारण्यापूर्वी ते इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, आनंद (आयआरएमए) येथील संचालक आणि आरबीआय चेअर प्राध्यापक होते. त्यांनी आयआयटी मद्रास येथे ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. याशिवाय बीआयटीएस पिलानी, उतारा युनिव्हर्सिटी (मलेशिया) आणि ट्युलन युनिव्हर्सिटी (यूएसए) येथेही त्यांनी विविध अकादमिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
त्यांनी आयआयटी कानपूर येथून अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये पीएच.डी. केली असून, हेल्थ सिस्टम मॅनेजमेंटमधील डिप्लोमा ट्युलन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून घेतला आहे. हेल्थ इकॉनॉमिक्स, सार्वजनिक धोरण व विकास अभ्यास क्षेत्रात त्यांचे संशोधन जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त आहे.
९० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि जागतिक सहकार्य
प्रा. दाश यांचे ९० हून अधिक संशोधन लेख ‘दि लँसेट, बीएमसी पब्लिक हेल्थ, इंटरनॅशनल जर्नल फॉर ईक्वीटी इम हेल्थ’ यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी डीएफआयडी, डब्लूएचओ, रॉकफेलर फाउंडेशन आणि अॅक्सेस हेल्थ इंटरनॅशनल यांसारख्या संस्थांसोबत विविध प्रकल्पांवर काम केले आहे. दक्षिण आफ्रिका, थायलंड, बांगलादेश, इथिओपिया, नायजेरिया, केनिया आणि यूकेमधील संस्थांबरोबर त्यांनी संयुक्त संशोधन केले आहे.
डॉ. दाश यांनी आतापर्यंत १७ पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन केले असून, त्यांच्यापैकी अनेक संशोधक देश-विदेशातील नामांकित संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या सहकार, पंचायती राज, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांशी निगडीत विविध सल्लागार समित्यांवर काम केले आहे. ते राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट (एनटीएजीआय) चेही सदस्य राहिले आहेत.
सध्या ते आयआयटी इंदोर, एनआयआरडी अँड पीआर हैदराबाद, एलबीएसआयएम नवी दिल्ली, एनआयबीएम पुणे, आणि एनआयआरटी चेन्नई यांसारख्या प्रमुख संस्थांच्या शैक्षणिक व प्रशासकीय मंडळांचे सदस्य आहेत.

More Stories
पुणे विमानतळातील बिबट्या यशस्वीपणे बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या पकडला
शिवसेनेची १६५ जागा लढविण्याची तयारी – महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर
Pune: समाविष्ट २३ गावांत बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेकडे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णय