September 11, 2025

कुठल्याही प्रकारचा फोटो किंवा व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेला नाही ः पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्पष्टीकरण

पुणे, २९ जुलै २०२५ः खराडी परिसरातील एका हाय-प्रोफाइल हाऊस पार्टीवर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या छाप्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित काही आरोप हे पूर्णपणे “निराधार आणि बिनबुडाचे” आहेत.

छापेमारीदरम्यान पोलिसांनी एकूण सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनिष खेवलकर यांचाही समावेश आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर चर्चा रंगली असून काही नेत्यांनी पोलिसांवर कारवाईबाबत टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज टिळक रोडवरील गणेश मंडळांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान माध्यमांनी आयुक्त कुमार यांना या प्रकरणाविषयी विचारले असता त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या.

“कारवाई ही गुप्त माहितीनंतर केली असून ती पूर्णतः कायदेशीर, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडली आहे. यामध्ये पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली काम केलेले नाही. पोलिस दलावर कुणीही शंका घेण्याचे कारण नाही,” असे आयुक्त अमितेश कुमार यांनी ठामपणे सांगितले.

एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर आरोप केला होता की, डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधील काही खासगी फोटो पोलिसांकडून लीक करण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना आयुक्त कुमार म्हणाले, “पोलिसांकडून कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ लीक करण्यात आलेला नाही. काही वेळा स्थानिक नागरिक किंवा पत्रकार कारवाईच्या वेळी स्वतःचे फोटो किंवा व्हिडिओ घेतात, त्यावर आमचे नियंत्रण नाही.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “पोलिस दल म्हणून आमचे सर्व कारवाईचे निकष स्पष्ट व पारदर्शक आहेत. कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा पक्षपातीपणाने निर्णय घेतलेले नाहीत. जनतेने आणि प्रसारमाध्यमांनी पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवावा.”