पुणे, १ ऑगस्ट २०२५ : शहरातील नळजोडांना पाणी मीटर बसवण्याच्या कामावर जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्यांविरोधात आता महापालिकेने थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीनंतर प्रशासनाने ही भूमिका अधिक तीव्र केली असून, पाणी गळती रोखण्यासाठी व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी मीटर अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले जात आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मीटर बसवण्याचे काम हाती घेतले असले तरी काही भागांमध्ये नागरिक व राजकीय व्यक्ती यांकडून विरोध करण्यात येतो आहे. हा विरोध टोकाचा झाल्यास संबंधितांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी अधिकृत पत्रकात दिला आहे.
पाणी मीटर बसवल्यास गळती सहजपणे शोधता येणार असून, अतिरिक्त पाणी वापरावरही नियंत्रण ठेवता येणार आहे. याशिवाय, पाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्याचे प्रकार टाळता येणार आहेत. शहरातील वाढत्या पाणी गरजा लक्षात घेता, यापुढील काळात प्रत्येक नळजोडीवर मीटर बसवणे अत्यावश्यक आहे, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
पाणी मीटर नसेल, तर कपात अटळ
महापालिकेच्या अंदाजानुसार, पुढील महिन्यात सर्व नळजोडींवर मीटर बसविण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र विरोध कायम राहिल्यास पाणी पुरवठ्यावर सरसकट कपात करावी लागेल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
More Stories
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान
Pune: जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध
Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ