पुणे, ४ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरात यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना व नियम जाहीर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, २०१९ साली घेतलेले परवाने पुढील पाच वर्षांसाठी वैध ठरणार आहेत, त्यामुळे त्या मंडळांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. यासाठी कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती महापालिकेने दिली आहे.
तथापि, शहराच्या हद्दीत अलीकडे समाविष्ट झालेल्या गावांतील मंडळे, नव्याने उत्सव साजरा करणारी मंडळे अथवा ज्यांची जागा बदलली गेली आहे, त्यांना २०१९ मधील कार्यपद्धतीनुसार नव्याने परवाने घ्यावे लागणार आहेत. या मंडळांना मदतीसाठी PMC व पोलिस विभागाच्या संयुक्त उपक्रमातून ‘एक खिडकी योजना’ राबवली जाणार आहे.
🔸 मंडप उभारणीसाठी अटी कठोर
मंडपाची उंची ४० फूटांपेक्षा जास्त नसावी, त्यापेक्षा अधिक उंचीच्या मंडपासाठी स्थापत्य अभियंत्याचे स्थिरता प्रमाणपत्र (Stability Certificate) अनिवार्य आहे.
आपत्कालीन वाहने (अग्निशमन, रुग्णवाहिका, बसेस) यांना अडथळा होणार नाही, यासाठी रस्ते व कमानी १८ फूटांहून उंच असाव्यात.
स्थानिक रहिवाशांना, पादचाऱ्यांना व वाहनांना अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे मंडळांची जबाबदारी राहील.
🔸 मूर्ती व पर्यावरण रक्षण
महापालिकेने सर्व मंडळांना शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणविषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.
🔸 उत्सवानंतर स्वच्छता बंधनकारक
उत्सव संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत सर्व मंडप, कमानी, देखावे हटवणे, तसेच रस्त्यावर झालेली खड्डी स्वतः बुजवून जागा पूर्ववत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
🔸 परवाना मंडपावर लावणे अनिवार्य
प्रत्येक मंडळाने मिळालेल्या परवान्याची प्रत प्लास्टिक कोटिंग करून मंडपाच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असेल. महापालिकेला गरज भासल्यास परवाना रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे.
🔸 तक्रार निवारण यंत्रणा सज्ज
तक्रारींसाठी PMC कडून विविध संपर्क सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत:
– संकेतस्थळ: http://complaint.punecorporation.org
– टोल फ्री क्रमांक: 1800 103 0222
– मोबाईल अॅप: PUNE Connect (PMC Care)
– WhatsApp: 9689900002
-ई-मेल: feedback@punecorporation.org / encroachment1@punecorporation.org
– संपर्क क्र.: 020-25501398
🔸 गणेशमूर्ती विक्रीसाठी अधिकृत जागा उपलब्ध
गणेशमूर्ती विक्रीसाठी मनपाच्या शाळांच्या पटांगणांसह मोकळ्या जागा उपलब्ध करून त्यासाठी परवाने दिले जाणार आहेत. अनधिकृत विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
More Stories
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन