पुणे, ५ ऑगस्ट २०२५: मुठा नदीपात्रात सुरू असलेल्या नदीसुधार प्रकल्पातील ड्रेनेज लाईनच्या कामात सुरक्षेची पातळी धाब्यावर बसवली गेल्याने सोमवारी एका कामगाराचा मृत्यू, तर तिघेजण जखमी झाले. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच मृत व जखमी कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने भरपाई देण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आयुक्त राम यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या कामगारांची भेट घेतली आणि अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. यावेळी त्यांनी पुढील सर्व कामांमध्ये कामगारांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
नदीसुधार प्रकल्प जपान सरकारच्या ‘जायका’ संस्थेच्या मदतीने सुरू आहे. हे काम सुरतमधील ‘न्वायरो कंट्रोल अॅण्ड तोशिबा वॉटर सोल्युशन’ या कंपनीकडे दिले आहे. कंपनीने स्थानिक ठेकेदारामार्फत काम सुरू केले असून याच दरम्यान ही दुर्घटना घडली.
घटनेनंतर आयुक्तांनी तातडीने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित होणार असून, कंपनीवर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत. बैठकीत पुढील निर्णय अपेक्षित आहे.

More Stories
पुणे विमानतळातील बिबट्या यशस्वीपणे बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या पकडला
शिवसेनेची १६५ जागा लढविण्याची तयारी – महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर
Pune: समाविष्ट २३ गावांत बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेकडे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णय