पुणे, ८ ऑगस्ट २०२५ : हिंजवडी आणि चाकण परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित भागात तातडीने रस्ते विकसित करण्याचे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात आज सकाळी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
या बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी समन्वयाची गरज
चाकण एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिक, कामगार व वाहनचालक करत आहेत. यासंदर्भात अजित पवार म्हणाले, “अतिक्रमण काढल्यानंतर तातडीने रस्ते विकसित न केल्यास पुन्हा अतिक्रमण वाढते. त्यामुळे यंत्रणांनी एकत्रितपणे आणि नियोजनपूर्वक काम करावे.”
ट्रक टर्मिनल आणि वेळापत्रकाचे नियोजन
अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून एमआयडीसी भागात ट्रक टर्मिनल सुरू करण्यावर भर द्यावा, तसेच अशा वाहनांना ठराविक वेळेतच प्रवेश देण्याचे नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. या कामासाठी आरटीओ आणि पोलीस यंत्रणेने संयुक्त नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते अडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
“रस्ते विकसित करताना कोणी अडथळा निर्माण करत असेल, तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करा,” असे कठोर आदेशही अजित पवार यांनी दिले. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. म्हसे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तयार केलेल्या मास्टर प्लॅन आणि उपाययोजनांची माहिती दिली.
पाहणी दौरा : चाकण ते म्हाळुंगे परिसरात तपासणी
बैठकीपूर्वी अजित पवार यांनी स्वतः चाकण एमआयडीसी परिसरात वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांची पाहणी केली. भारत माता चौक, समृद्धी पेट्रोल पंप, नाणेकरवाडी, सासे फाटा, आंबेठाण चौक, म्हाळुंगे पोलीस चौकी आदी ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले.
गेल्या महिन्यातील उपाययोजना दिलासादायक
हिंजवडी परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी झाली असून नागरिकांना दिलासा मिळतो आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. याच गतीने चाकण परिसरातही कामे सुरू ठेवावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
More Stories
पुण्यात प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात जोरदार मोर्चा
“जैन धर्माच्या पवित्र जागेचा सौदा – ट्रस्टकडून बिल्डरच्या घशात जमीन घालण्याचा डाव!”
Pune: उंड्रीमध्ये एका सदनिकेत आगीची घटना; एक मृत तर पाच जखमी