October 7, 2025

Pune: रक्षाबंधन सणानिमित्त महिला प्रवाशांसाठी ‘लकी-ड्रॉ’ योजना – पैठणी आणि मोफत बसपास जिंकण्याची संधी!

पुणे, ०८/०८/२०२५: परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक पंकज देवरे साहेब यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन सणानिमित्त अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, दि. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी महिला प्रवाशांसाठी ‘लकी-ड्रॉ’ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.

पीएमपीएमएल पुणे, पिंपरी-चिंचवड, उपनगरे आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात दररोज सुमारे ११ ते १२ लाख प्रवाशांची वाहतूक करते. यामध्ये ४ ते ४.५ लाख महिला प्रवासी दररोज बससेवेचा लाभ घेतात. महिलांसाठी सुरक्षित, सुलभ व किफायतशीर सेवा देण्याचा पीएमपीएमएलचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

लकी-ड्रॉ योजनेची वैशिष्ट्ये
• दि. ०९/०८/२०२५ रोजी वाहकाकडून घेतलेले प्रिंटेड तिकीट/दैनंदिन पास, युपीआय द्वारे किंवा मोबाईल अ‍ॅपवरून काढलेले तिकीट/ दैनंदिन पास असलेल्या महिला प्रवाशांनाच सहभाग घेता येईल.
• योजनेतून एकूण १७ महिला विजेत्यांची निवड संगणकीकृत सोडत पद्धतीने केली जाणार आहे.
• विजेत्यांना ‘कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज’ तर्फे पैठणी व पीएमपीएमएल कडून एक महिन्याचा मोफत बस पास प्रदान करण्यात येईल.
• या उपक्रमासाठी रेडिओ मिर्ची ९८.३ हे रेडिओ पार्टनर असून, त्यांच्यातर्फे या योजनेचे व्यापक प्रमोशन करण्यात येत आहे.

सहभागाची प्रक्रिया
 बसमध्ये लावण्यात आलेला क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाइन फॉर्म भरता येईल.
 स्मार्टफोन नसलेल्या महिला प्रवाशांनी वाहकाकडून कूपन घ्यावे व आवश्यक माहिती भरून बसमधील बॉक्समध्ये टाकावे.
 एका तिकीटासाठी एका मोबाईल नंबर वरून एकदाच सहभाग घेता येईल.
 ऑनलाइन/ऑफलाइन फॉर्मवर तिकीट क्रमांक व आधार कार्डवरील शेवटचे चार अंक नमूद करणे आवश्यक आहे.
 चुकीची/अपूर्ण माहिती दिल्यास किंवा तिकीट/ दैनंदिन पास सादर न केल्यास बक्षीस देण्यात येणार नाही.

नियम व अटी
 पीएमपीएमएलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
 लकी-ड्रॉ रद्द/स्थगित करण्याचे व अटींमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार पीएमपीएमएलकडे राहतील.
 विजेत्यांची नावे व सोडतीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

या रक्षाबंधन सणाला एक वेगळीच आनंदाची जोड देण्यासाठी, महिला प्रवाशांनी या लकी-ड्रॉमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमपीएमएल तर्फे करण्यात येत आहे.