September 11, 2025

इस्त्राईल देशामध्ये रोजगाराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, १२ ऑगस्ट २०२५ : कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागामार्फत आरोग्य क्षेत्रातील अर्हताप्राप्त उमेदवारांना इस्त्राईल देशामध्ये घरगुती सहायक या पदाकरिता काम करण्यास इच्छुक उमदेवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

उमेदवाराचे वय 25 ते 45 वयोगटातील असावे, त्याला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असण्यासोबत त्यांच्याकडे काळजीवाहू-घरगुती सहायक सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र असावे. तसेच मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

उमेदवाराकडे किमान 3 वर्षे वैध असणारा पासपोर्ट असणे अनिवार्य असून यापूर्वी इस्त्राईलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा किंवा तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्त्राईल देशामध्ये सध्या काम करीत नसावे किंवा इस्त्राईल देशाचे रहिवासी नसावेत, अशी अट आहे.

याकामी जिल्ह्यातील पुढाकार घेऊन कौशल्य स्पर्धेबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी,अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र,481, रास्ता पेठ,पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.