September 11, 2025

Pune: ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध आदेश जारी

पुणे दि. १३/०८/२०२५: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या मध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

हे आदेश 12 ऑगस्ट 2025 पासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. आदेशाचा भंग करुन पोलीसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेरादवारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.