पुणे, 16/08/2025: श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय… हरे रामा हरे कृष्णा… राधे कृष्ण गोपाल कृष्ण… च्या जयघोषात कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल तीन लाख भाविकांनी राधाकृष्णाचे दर्शन घेतले तर, हजारो भक्तांनी भगवान श्रीकृष्णाला अभिषेक केला. अभिषेकाच्या ठिकाणी वृंदावनातील नंदगाव येथील विविध मंदिरांचा आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता.
संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद स्थापित आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा झाला. रत्नजडीत वस्त्रालंकारानी सजलेल्या राधाकृष्णाचे रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच फुलांनी सजविलेल्या पाळण्यातील बालकृष्णाला पाळणा देत भाविकांनी जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला. मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, रेवतीपती प्रभू, जयदेव प्रभू या मंदिराच्या वरिष्ठ भक्त मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भगवंतांना हरे-कृष्ण महामंत्राच्या जयघोषात मंदिरातील भक्तवृंदातर्फे महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवंतांना २५० प्रकारचे नैवेद्य दाखवून बरोबर रात्री १२ वाजता आरती करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी दिली. उपाध्यक्ष संजय भोसले यांनी जन्माष्टमी महोत्सवाचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आणि इस्कॉन संस्थेच्या जगभरातील उपक्रमांबद्दल सांगितले. विशेष अतिथी कक्षातर्फे संपर्क प्रमुख अनंतगोप प्रभू आणि प्रसाद कारखानीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. दर्शन आणि अभिषेकसाठी पुण्यातील सर्व आमदार, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पालिकेतील आयुक्त आणि उपायुक्त आले होते
मंदिरामध्ये जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णसमर्पण’ सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवात देशभरातून ८०० कलावंतांनी शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित केली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा-वृंदावन चंद्र, जगन्नाथ-बलदेव-सुभद्रा आणि गौर-निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र-आभूषणांनी सजविण्यात आले होते. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजी चे सुंदर मंदिर आहे. या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
इस्कॉन मंदिरात राधा-कृष्णांच्या पोशाखांवर गोमती आणि गोवर्धन पर्वताचे सुंदर डिझाइन
जन्माष्टमीनिमित्त, इस्कॉन मंदिरातील राधा आणि कृष्णांचे कपडे खूप खास असतात. कारागीर या कपड्यांवर अनेक महिने काम करतात. ते कपडे जरी, मोती आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी बनवलेले असतात. दरवर्षी, भगवान श्रीकृष्णासाठी एका विशिष्ट थीमवर आधारित कपडे तयार केले जातात. मंदिराचे मुख्य पुजारी रूप गोस्वामी प्रभू आणि उत्सव प्रमुख कौस्तुभ प्रभू यांनी सांगितले की, यावर्षी देवाचे कपडे पूर्णपणे हाताने भरतकाम केलेले आहेत. या कपड्यांसाठी लागणारे साहित्य विविध देशांमधून मागवण्यात आले. जपानमधून मोती, ऑस्ट्रेलियातून स्टोन आणि अमेरिकेतून हिरे मागवण्यात आले.
जन्माष्टमीच्या दिवशी देवाचा विशेष अभिषेक करण्यात आला, ज्यामध्ये १५० लिटर रसाचा वापर करण्यात आला. यात विविध पदार्थांचे मिश्रण असते. हा अभिषेक २ तास चालला आणि यात २०० हून अधिक भक्तांनी सेवा दिली. या व्यतिरिक्त, राधा-कृष्णांचा ५० किलो फुलांनी अभिषेक करण्यात आला. मंदिराची सजावटीत गोवर्धन लीलेचे प्रदर्शन होते.

More Stories
पुणे: महापालिका निवडणुकीत महायुतीचा दावा; पण मित्रपक्षांची स्वबळावरची मोहीम गतीत
Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन