September 11, 2025

पुण्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट : महापालिका सज्ज

पुणे, १९ ऑगस्ट २०२५: हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्णपणे सतर्क झाला आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यास पाणी नागरी भागात शिरू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन अशी पथके तैनात करण्यात आली असून, ड्रेनेज विभाग व स्थानिक स्तरावरील कर्मचारीही सतत गस्त घालत आहेत. आतापर्यंत झाडांच्या फांद्या तुटणे, रस्त्यावर पाणी साचणे अशा किरकोळ तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सोमवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. हवामान विभाग आणि सी-डॅक यांनी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर सर्व क्षेत्रीय सहाय्यक आयुक्तांना अलर्ट करण्यात आले आहे.

शहरात सोमवारी सकाळपासून सतत पाऊस सुरू आहे. बाणेर, शंकरशेठ रस्ता, येरवडा येथील गुंजन टॉकीज परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या असून महापालिकेच्या पथकांनी तातडीने कारवाई केली आहे. घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांतून पाणी सोडले जाऊ शकते. मात्र त्याचा परिणाम नागरिकांवर होऊ नये, यासाठी महापालिका जलसंपदा विभाग व पोलिस खात्याशी सातत्याने संपर्कात आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्य व उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली असून, महापालिकेचे अधिकारीही पथकांवर थेट लक्ष ठेवून आहेत.