पुणे, २० ऑगस्ट २०२५ : राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल आदी मान्यवर उपस्थित होते.
शेलार यांनी सांगितले की, यंदा गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनप्रसंग, ‘ऑपरेशन सिंदूर’, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीतील १२ गडकिल्ले, पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर आधारित जनजागृती करावी.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करावा, तसेच त्यांच्या कर्तृत्वावर माहितीफलक उभारावेत. प्रशासनाशी समन्वय ठेवून शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ध्वनी, वीज व इतर सोयी:
७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी; निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर
गणेश मंडळांसाठी महावितरणकडून वीजपुरवठ्याची खात्री
भजनी मंडळांना मोफत साहित्य, त्यासाठी संकेतस्थळाचे उद्या लोकार्पण
प्रसिद्ध मंडळांसाठी थेट प्रक्षेपणाची सोय, जेणेकरून नागरिकांना घरातून दर्शन
विशेष कार्यक्रम आणि स्पर्धा:
केंद्रीय राखीव पोलीस दलाचा बँड शो, पोलीस बँड शो व डॉग शोचे आयोजन
शाळा-महाविद्यालये, NSS विद्यार्थी आणि सामाजिक संस्था सहभागी उपक्रम
मराठी नाट्यमहोत्सव, चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला
समाजमाध्यमांद्वारे व्यापक प्रचार
प्रशासनाची तयारी:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन शो, महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण, सरकारी इमारतींवर बोधचिन्हाची रोषणाई, तसेच जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पावसाच्या अंदाजानुसार हवामान विभागाच्या माहितीनुसार प्रशासनाने तयारी ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले.
शेलार यांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सव हा सन्मान, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतन यासाठी व्यासपीठ ठरले पाहिजे. विदेशी विद्यार्थी, नागरिक व दुतावासातील अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर