October 19, 2025

पुणे महापालिका निवडणूक : अखेर प्रभाग रचना जाहीर!

पुणे, २२ आॅगस्ट २०२५: पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रतिक्षेत असलेली प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आहे. तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी प्रारूप प्रभाग रचनेचे उद्घाटन केले.

२०११ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ३४.८१ लाख आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ४.६८ लाख तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४० हजार आहे. या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यासाठी ४० चार सदस्यीय आणि एक पाच सदस्यीय असा मिळून ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.

नगरविकास विभागाच्या नव्या वेळापत्रकानुसार, प्रभाग रचना ४ सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध होईल. ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. मात्र अंतिम प्रभाग रचना पूर्वनियोजित मुदतीतच निश्चित केली जाणार आहे.

या घोषणेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २०१७ मधील प्रभाग रचनेवरून मोठा वाद झाला होता. यंदा राज्यात महायुती सत्तेत असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नव्या रचनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.