पुणे, २२ ऑगस्ट २०२५ : पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत यंदा उद्भवलेला क्रमावरील वाद अखेर सामोपचाराने मार्गी लागला आहे. केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने घेतलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांच्या संयुक्त बैठकीत यंदाची मिरवणूकही पारंपरिक क्रमानेच काढण्यात येईल असा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविक व गणेशभक्तांची उत्सुकता वाढवणारी ही मिरवणूक नेहमीप्रमाणेच पारंपरिक ढंगात होणार आहे.
वादाची पार्श्वभूमी व तोडगा
यावर्षी काही मंडळांनी नियोजित वेळेपूर्वी मिरवणुकीत सहभाग घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे इतर मंडळांकडून आक्षेप नोंदवले गेले आणि वाद निर्माण झाला. यावर तोडगा काढण्यासाठी खासदार मोहोळ आणि आमदार माधुरी मिसाळ-रासणे यांच्या उपस्थितीत मानाच्या व इतर मंडळांची बैठक घेण्यात आली. चर्चेनंतर सर्व मंडळांनी आपली मते मांडत सामंजस्याचा मार्ग स्वीकारला.
मोहोळ यांचे वक्तव्य
बैठकीनंतर बोलताना मोहोळ म्हणाले, “पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव ही केवळ शहराची नव्हे तर देशाची परंपरा आहे. जगभरातून भाविक हा सोहळा पाहण्यासाठी येतात. अशा वेळी वाद निर्माण होणे उत्सवाच्या प्रतिमेला बाधक ठरले असते. मात्र परस्पर चर्चेतून सर्वांनी परंपरेनुसार मिरवणुकीचा निर्णय घेतल्याने एकात्मतेचा संदेश गेला आहे. समजुतीची भूमिका घेतलेल्या सर्व मंडळांचे मी अभिनंदन करतो.”
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
मिरवणूक नेहमीप्रमाणे पारंपरिक क्रमानेच होईल.
मिरवणुकीचा शुभारंभ सकाळी साडेनऊ वाजता केला जाईल.
स्थिर वादन कोणतेही मंडळ करणार नाही.
मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व मंडळांची राहील.
दोन मंडळांमधील अंतर कमी करण्यासाठी समन्वय वाढवला जाईल.
या निर्णयामुळे पुण्याच्या “मानाच्या पाच गणपती” पासून ते इतर सर्व मंडळांची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे पारंपरिक, उत्साही आणि सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर