September 11, 2025

महागाईतही बाप्पा तुमच्या किंमतीत; मनसेचा अनोखा उपक्रम, राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, २३ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना महागाईच्या काळातही प्रत्येक घरात बाप्पा विराजमान व्हावेत, यासाठी मनसेचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रविवार पेठेत मनसेचे संघटक प्रल्हाद गवळी मित्र परिवाराच्या वतीने नागरिकांना त्यांच्या परवडीनुसार गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

हा उपक्रम गेली पाच वर्षे राबवला जात असून दरवर्षी सुमारे सात हजारांहून अधिक गणेशमूर्ती नागरिकांना त्यांच्या परवडीनुसार दिल्या जातात. मूर्तींच्या विविध प्रतिकृती उपलब्ध असून, नागरिकांना ज्या किंमतीत घेणे शक्य आहे, त्या किंमतीत मूर्ती देण्यात येतात.

या संकल्पनेची प्रेरणा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे कोणतेही कुटुंब बाप्पा घरी बसवण्यापासून वंचित राहू नये, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे प्रल्हाद गवळी यांनी सांगितले.

यंदाही सात हजारांहून अधिक मूर्ती या उपक्रमाद्वारे नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असून, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.