September 11, 2025

समाविष्ट गावांतून १९ नगरसेवकांची शक्यता; सात प्रभागांवर गावांचा ठसा, जुन्या हद्दीतील नगरसेवकांना फटका

पुणे, २६ ऑगस्ट २०२५ ः पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून, त्यात समाविष्ट गावांना महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाल्याचे दिसते. नव्या रचनेनुसार सुमारे १८ ते १९ नगरसेवक हे समाविष्ट गावांतून निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र, या बदलामुळे जुन्या हद्दीतील काही प्रभाग रद्द झाले असल्याने विद्यमान माजी नगरसेवकांना योग्य प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.

महापालिकेची निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून रखडली असून, आता ती जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवकांची निवडणूक जाहीर केली आहे. २०१७ मध्ये ४० प्रभागांतून १६० नगरसेवक निवडले गेले होते. त्यानंतर ११ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. २०२१ मध्ये आणखी २३ गावे जोडली गेली, परंतु फुरसुंगी व उरुळी देवाची स्वतंत्र नगरपरिषदेत गेले. त्यामुळे आता ३२ गावांचे प्रतिनिधित्व किती असेल, याकडे लक्ष लागले होते.

सात प्रभागांतून गावांचा प्रभाव ः
प्रभाग १५ (मांजरी बुद्रुक–साडेसतरा नळी), प्रभाग ३३ (शिवणे–खडकवासला) आणि प्रभाग ४१ (मोहम्मदवाडी–उंड्री) येथून मिळून १२ नगरसेवक निवडले जातील.

प्रभाग ३८ (कात्रज–आंबेगाव) हा एकमेव पाच सदस्यीय प्रभाग असून नऱ्हे, आंबेगाव, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी आदी गावांचा समावेश आहे. येथून किमान दोन नगरसेवक गावांतून येऊ शकतात.

प्रभाग ३ (विमाननगर–लोहगाव) आणि प्रभाग ४ (खराडी–वाघोली) या दोन प्रभागांत प्रत्येकी दोन नगरसेवकांची अपेक्षा आहे.

प्रभाग ९ (सूस–बाणेर–पाषाण) येथून सूस गावाला एक प्रतिनिधी मिळू शकतो.

अशा प्रकारे सात प्रभागांतून १९ नगरसेवक महापालिकेत पोहोचू शकतात.

समाविष्ट गावांतून नगरसेवक निवडले गेले, तर त्या भागातील विकासाला गती मिळू शकते. मात्र, गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण प्रभागात कार्यरत असणारा उमेदवारच यशस्वी होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. केवळ फ्लेक्सबाजी करणाऱ्यांनी समाविष्ट गावांना न्याय मिळणार नाही, अशी स्पष्ट टिप्पणी करण्यात येत आहे.

“पुण्यातून १६५ नगरसेवकांची निवड होणार आहे. सध्याच्या प्रभाग रचनेनुसार किमान १६ ते १९ नगरसेवक समाविष्ट गावांतून निवडले जातील. ही रचना गावांना न्याय देणारी आहे. यासंदर्भात आम्ही पूर्वी केलेला अभ्यास खरा ठरला आहे,” असे माजी विरोधीपक्ष नेते सुहास कुलकर्णी यांनी नमूद केले.