September 11, 2025

तात्पुरती वीज संच उभारणीसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन

पुणे, २६ ऑगस्ट २०२५:- सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करताना नागरिकांनी खालील प्रमाणे खबरदारी घेण्याबाबत अधिक्षक अभियंता, पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ हे.ना.गांगुर्डे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले आहे.

शक्यतो तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करण्यात येऊ नये. वीज संघ मांडणीस कमीत कमी जोड असावेत, वीज संच मांडणीची उभारणी अधिकृत विद्युत ठेकेदार यांचेकडूनच करण्यात यावी, लोखंडी साहित्य वापरुन स्टेज उभारणी केल्यास धातूच्या भागास सक्षम भुसंबंधन /आर्थिगशी जोडण्यात यावे. वीज संच मांडणीस अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर अथवा तत्सम उपकरणाची (स्वीचगिअर) ची जोडणी करण्यात यावी, गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शोभा यात्रा गाडयांची उंची नियमानुसार राखावी जेणेकरुन उघडया वीज वाहिनीच्या संपर्कात येणार नाही. वीज संच मांडणीवर क्षमतेपेक्षा जास्त भार (लोड) जोडण्यात येऊ नये. संचमांडणी सहजासहजी लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.