पिंपरी, ११ सप्टेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मालमत्ता करावर विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरून या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य आधार आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून केलेल्या सहकार्यामुळे महापालिकेला रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता अशा महत्त्वाच्या सेवांची अंमलबजावणी करण्यास मदत होते. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना दिली जाणारी ४ टक्के सवलत ही नागरिकांसाठी एक मोठी संधी आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ही संधी न गमावता ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन कर भरावा. — प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
मालमत्ता कर भरणे ही केवळ जबाबदारी नसून शहराच्या प्रगतीला थेट हातभार आहे. नागरिकांनी थकबाकी न ठेवता वेळेत कर भरला, तर महापालिकेला सेवा अधिक सक्षमपणे देता येतात. त्यामुळे अद्याप ज्यांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी उशीर न करता त्वरित कर भरणा करावा. — अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
शहरातील विकासकामे, सुविधा व सेवांची अखंडित अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी वेळेवर कर भरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेवर मालमत्ता कर भरावा, असे आवाहन सातत्याने महापालिकेच्या वतीने करण्यात येत असते. तसेच वेळेवर मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी विविध सवलती देखील जाहीर करण्यात येतात. आता महापालिकेने ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना चालू वर्षाच्या सामान्य करावर थेट ४ टक्के सवलत देऊ केली आहे. तरी जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
…..
असा भरा ऑनलाइन कर
• पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
• मुख्य पृष्ठावरील ‘नागरिक’ या पर्यायावर क्लिक करा आणि ‘मालमत्ता कर विभाग’ येथे जा.
• त्यानंतर मालमत्तेला जोडलेला मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाका.
• त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर, ‘बिल भरा’ हा पर्याय निवडा आणि आपल्या मालमत्ता कराचे बिल सवलतीसह भरा.
More Stories
पुणे महापालिकेने महावितरणला पिंपरी चिंचवड प्रमाणे रस्ते खुदाई शुल्क आकारावे: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
Pune: भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग
PCMC: अर्थसंकल्प २०२६-२७ अधिक लोकाभिमुख व सर्वसमावेशक करण्यासाठी अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन