September 11, 2025

Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे

पुणे, १० सप्टेंबर २०२५ : पुणे शहरातील खड्ड्यांची माहिती नागरिकांकडून माहिती मिळावी आणि प्रशासनाकडून त्वरित त्याची दखल घेऊन कार्यवाही व्हावी यासाठी महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र’ ॲपवर सुरु केले आहे. गेल्या महिन्याभरात या ॲपवर १ हजार २७४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यापैकी १ हजार १८९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागात खड्डे असून, तेथील रस्ते चांगले कधी होणार असा प्रश्‍न उपस्थित राहात आहे.

पथ विभागातर्फे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण करून खड्डे पडू नयेत याची काळजी घेतली जाते. पण पावसाळा सुरु झाला की नव्याने डांबरीकरण झालेल्या अनेक रस्त्यांना खड्डे पडतात, यंदाही शहरात पावसामुळे गल्लीबोळांसह प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरल्याने दुचाकी घसरण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

शहरात सांडपाणी वाहिनी आणि जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आल्यानंतर रस्ते दुरुस्त केले होते. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी पॅचवर्क खचले असून त्यात पाणी साचून खड्डे पडले.

कात्रज-कोंढवा रस्ता, राजस सोसायटी चौक, माणिकबाग, मध्यवर्ती पेठा, धायरी, नऱ्हे, डीएसके विश्‍व रस्ता, वारजे, कर्वेनगर, महमंदवाडी, कोंढवा, वानवडी, मुंढवा, येरवडा यासह समाविष्ट ३२ गावांमधील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. यातील सर्वच खड्डे प्रशासनाने बुजविलेले नाहीत. नागरिकांकडून ‘रोड मित्र ॲप’द्वारे खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत. यामध्ये झोन एक कात्रज सिंहगड भागातून २७५, झोन दोन कोंढवा येवलेवाडी १५३, झोन तीन भवानी पेठे कसबा क्षेत्रीय कार्यालय ५६, झोन चार मुंढवा, हडपसर, उंड्री २६३, झोन पाच खराडी, लोहगाव, कोरेगाव पार्क, वाघोली २४२, झोन सहा कोथरूड, बावधन, वारजे, कर्वेनगर ११५, झोन सात बालेवाडी, पाषाण, बोपोडी १७० अशा एकूण १ हजार २७४ तक्रारी ॲपद्वारे नोंदविल्या गेल्या असून, १ हजार १८९खड्डे बुजविले आहेत. ७७ तक्रारींचे लवकर निराकरण केले जाईल, असे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

ॲपमध्ये सुधारणा आवश्‍यक
महापालिकेचे ‘रोड मित्र ॲप’ आतापर्यंत हजारो नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. त्यात त्यांना मोबाईलचे जीपीएस चालू करून, ज्या ठिकाणी खड्डा पडला आहे त्याच ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन फोटो काढावा लागतो. तरच तो फोटो ॲपवर अपलोड होतो. अनेकदा नागरिकांना फोटो अपलोड करताना अनेकदा प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे ॲपच्या दर्जात सुधारणा झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया ऑनलाइन नोंदविण्यात आल्या आहेत.