पुणे, १० सप्टेंबर २०२५ ः पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ५ हजार ९२२ हरकती सूचना पुणेकरांनी नोंदविल्या आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी बालगंधर्व मंदिर येथे सकाळी १० वाजल्यापासून सुनावणी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव व्ही. राधा या सुनावणी घेणार आहेत.
पुणे महापालिकेत १६५ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत, त्यासाठी ४० प्रभाग हे चार सदस्यांचे तर एक प्रभाग हा पाच सदस्यांचा करण्यात आला आहे. ही प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप अनेकांनी केला असून, त्यामुळे हरकतींची संख्या सहा हजाराच्या जवळपास पोचली आहे. दोन दिवसात यांची सुनावणी पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासना पुढे आहे.
पहिल्या दिवशी गुरुवार (ता.११) प्रभाग क्रमांक १ ते २९ च्या प्रारूप रचनेवरील हरकतींवर सुनावणी होणार आहे. तर शुक्रवारी (ता. १२) प्रभाग क्रमांक ३० ते ४१ वरील हरकती, सूचनांवर सुनावणी होणार आहे. हरकती नोंदविलेल्या प्रत्येक नागरिकास महापालिकेने सुनावणीसाठीचे वेळापत्रक कळविले आहे. तसेच पत्र ही पाठवले आहे. नागरिकांना जी वेळ दिली आहे, त्या वेळेत येऊन त्यांची हरकत नोंदवावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार