पुणे, १२/०९/२०२५: वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी (ता. १२) अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या समवेत पुणे-नगर रस्त्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान, रस्त्यावरील पादचारी मार्गांच्या सुरक्षेची तसेच नागरिकांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला.
पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या यु-टर्नवर पादचारी सिग्नल व योग्य साईन बोर्ड बसवण्याची मागणी पठारे यांनी यावेळी केली. तसेच, रामवाडी येथील मेट्रो स्टेशन पार्किंग व खुळेवाडी कॉर्नर येथील यु-टर्नच्या विकासासंबंधी चर्चा पार पडली. खराडी परिसरातील दर्गा चौक व जकात नाका येथील वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य उपाययोजना करण्याच्या बाबतही चर्चा झाली.
आमदार बापूसाहेब पठारे या संदर्भात म्हणाले, की “रस्त्यावरील नागरिक सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पादचारी मार्ग सुधारणा आणि यु-टर्न व्यवस्थापनामुळे नागरिकांना सुरक्षित, सुलभ प्रवास करता येईल. वाहतूक पोलीस प्रशासनाने तातडीने या सुधारणा राबवाव्यात, अशी अपेक्षा आहे.” यावर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनीही रस्ता सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.
पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग हिम्मत जाधव, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव तसेच पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव व इतर कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.
More Stories
Pune: कोंढवा खुर्दमध्ये १५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ