September 20, 2025

Pune: सहा रस्त्यांवर सशुल्क पार्किंग, ४५ रस्त्यांवर नो पार्किंग झोन

पुणे, १६ सप्टेंबर २०२५ : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा सशुल्क पार्किंग (पे अँड पार्क) धोरणाला चालना दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सहा प्रमुख रस्त्यांवर सशुल्क पार्किंग सुरू करण्यात येणार असून ४५ हून अधिक रस्त्यांवर “नो पार्किंग झोन” लागू केले जाणार आहेत.

सशुल्क पार्किंगसाठी लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ), विमाननगर, बालेवाडी येथील हायस्ट्रीट आणि बिबवेवाडी या रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यांवरील गर्दी व रस्त्याच्या कडेला केले जाणारे पार्किंग यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या पाहणीतून समोर आले आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्रंदिवस दुचाकी व चारचाकी वाहनांचे रस्त्याच्या कडेला पार्किंग केले जाते. त्याचा परिणाम म्हणून वाहतुकीत कोंडी निर्माण होते. त्यामुळे मार्च २०१८ मध्ये महापालिकेत “नो पार्किंग, नो हॉल्टिंग” तसेच मर्यादित भागात सशुल्क पार्किंगसंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी निवडणुकीतील संभाव्य परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

या संदर्भात महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांशी चर्चा केली असून पथारी व्यावसायिकांच्या समितीशीही बैठक घेण्यात येणार आहे. परवानाधारक व्यावसायिकांना फटका बसू नये यासाठी त्यांच्या पुनर्वसनाचा विचार केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित ठरावानुसार, या रस्त्यांवर दुचाकी वाहनांसाठी प्रतितास तीन ते दहा रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी पाच ते पंधरा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, “शहरातील प्रमुख रस्त्यांवर सशुल्क पार्किंग करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. २०१८ मध्ये यासंदर्भातील ठराव करण्यात आला होता. त्या ठरावाच्या आधारे सशुल्क पार्किंग करण्याचा निर्णय घेतला जाणार असून प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.”

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील १४ चौकांमध्ये ५० मीटरपर्यंत “नो पार्किंग” आणि “नो हॉल्टिंग”ची अंमलबजावणी केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम वाहतुकीच्या गतीवर दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील ४५ रस्ते “नो हॉकर्स झोन” घोषित केले आहेत. तसेच शहरातील ३०० चौकांमध्ये ५० मीटरपर्यंत “नो पार्किंग झोन” करण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.