अनिल धनवटे
विश्रांतवाडी, २३ सप्टेंबर २०२५: डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (गोल्फ क्लब) येथील विद्यार्थ्यांचे विश्रांतवाडी येथील नवीन वसतिगृहात स्थलांतर होऊन दहा-बारा दिवस झाले आहेत. मात्र या कालावधीत मूलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाणी, स्वच्छतागृह, चार्जिंगची व्यवस्था, लिफ्ट, मेसची सोय, सुरक्षेची साधने अशा दैनंदिन गरजांकडे समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
गोल्फ क्लब वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, “येरवडा येथून स्थलांतर करताना जुन्या वसतिगृहातील सोयी नवीन वसतिगृहात मिळाव्यात अशी मागणी आम्ही केली होती. मात्र सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी स्थलांतरासाठी दबाव टाकला, तर उपायुक्त वंदना कोचुरे यांनी फक्त आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात कोणतीही सुविधा उपलब्ध झालेली नाही.”
अभ्यासिकेत सध्या २५० विद्यार्थ्यांसाठी केवळ ३२ आसनव्यवस्था आहे, त्यामुळे आसनांची संख्या जुन्या वसतिगृहाप्रमाणे किमान १२४ पर्यंत वाढवावी.
विद्यार्थ्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी प्रशासनाविरुद्ध आरोप करीत नाहीत, मात्र शिक्षणात अडथळा आणणाऱ्या गैरसोयी तातडीने दूर करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे
– अभ्यासिकेत सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल व लॅपटॉप चार्ज करण्यासाठी पुरेशी चार्जिंगची व्यवस्था करावी.
– प्रत्येक खोलीमध्ये इंटरनेट नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
– वसतिगृहात इंटरनेटसाठी राउटर बसवून द्यावेत.
– बंद पडलेले लिफ्ट त्वरित दुरुस्त करून सुरू करावेत.
– मेस मध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि दर्जेदार अन्न मिळण्याची व्यवस्था करावी.
– विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.
– वसतिगृहात पाण्याचे फिल्टर बसवून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
– स्वच्छतागृहांमध्ये सतत पाण्याची पूर्तता व्हावी याची खात्री करावी.
– वसतिगृहातील स्वच्छतागृहांमध्ये बादल्या, आरसे आणि पाणी ठेवण्यासाठी जग यांसारख्या आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात.
– विद्यार्थ्यांना गरजेनुसार गरम पाणी मिळावे म्हणून वसतिगृहात गिझर लावावे.
– विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामशाळेतील आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत.
– विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वसतिगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई