October 6, 2025

“जैन धर्माच्या पवित्र जागेचा सौदा – ट्रस्टकडून बिल्डरच्या घशात जमीन घालण्याचा डाव!”

अनिल धनवटे
पुणे, २ ऑक्टोबर २०२५ – जिथे समाजाचा इतिहास आहे, श्रद्धा आहे, जिथून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडले आहे, तीच सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन वसतिगृहाची जागा आता एका बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या विश्वस्तांकडून सुरू आहे. या कृतीला जैन समाजाने तीव्र विरोध केला असून, आज पुण्यातील मॉडर्न कॉलनी येथे कृती समितीकडून ठाम आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले.

या ठिकाणी असलेली १२,०१८ चौ. मी. (सुमारे १.३ लाख चौ. फूट) इतकी प्रचंड जागा २३० कोटी रुपयांमध्ये गोखले बिल्डरला विकली जात आहे. या भूखंडावर एफएसआय ४ असून, ५.१७ लाख चौ. फूट बांधकाम शक्य आहे आणि सध्याचा दर ₹२०,०००/चौ.फूट मानल्यास एकूण प्रकल्पाची बाजार किंमत १०३४ कोटी रुपयांहून अधिक आहे.

“१००० कोटींची जमीन, पण विक्री फक्त २३० कोटींना?”

प्रमुख आंदोलक योगेश पांडे यांनी थेट सवाल केला – “जिथे १००० कोटी रुपयांचे मूल्य आहे, तिथे ट्रस्टने केवळ २३० कोटींमध्ये सौदा का केला? हाच कायदेशीर वारसा विकायला लावणारा कोण आहे? आणि कोणाच्या फायद्यासाठी?”

ट्रस्टकडून सांगण्यात आले की, वसतिगृहाची अवस्था खराब असून पुनर्निर्माणासाठी पैसे नाहीत. परंतु याच ट्रस्टने अलीकडेच ८ कोटींची एफडी केली आहे, आणि दरवर्षी ४०-५० लाखांचे उत्पन्नही मिळते. मग इतकी मौल्यवान जमीन विकण्यामागे नेमका हेतू काय?

“वारसाला हात लावला, तर तीव्र संघर्ष अटळ” – कृती समितीचा इशारा

या सौद्याच्या विरोधात उभे राहणाऱ्या सुजाता बारगळे आणि चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितले – “ही केवळ जमीन नाही, हा जैन समाजाचा श्रद्धास्थान आणि वारसा आहे. जिथे पिढ्यानपिढ्या विद्यार्थी घडले, तिथे आता उंच टॉवर आणि फ्लॅट्स उभे राहणार का? समाज या विक्रीला कधीच मान्यता देणार नाही.”

कृती समितीने ट्रस्टकडून जमिनीच्या विक्रीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली असून, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.