October 8, 2025

टाकाऊ मधून टिकाऊ – पीएमपीएमएलकडून स्क्रॅप बसमध्ये ‘वाचनालय’

पुणे, ०७/१०/२०२५: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडून नागरिकांसाठी एक आगळीवेगळी संकल्पना राबवून ‘पीएमपीएमएल वाचनालय’ सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे.

परिवहन महामंडळाकडून नागरिकांसाठी मोफत ‘पीएमपीएमएल वाचनालय’ सुरू करण्यात येणार असून त्या वाचनालयाचे उद्घाटन परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता, फर्ग्युसन कॉलेज परिसरात होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व वाचन संस्कृतीचा प्रसार करणे हा त्यामागचा हेतू आहे. या संकल्पनेतून परिवहन महामंडळाच्या स्क्रॅप (बाद) बसचे पुनर्रचना करून ‘टाकावू पासून टिकाऊ’ अशा संकल्पनेवर आधारित वाचनालय बस तयार करण्यात आली आहे.

सदर वाचनालयासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विविध विषयांवरील सुमारे २५० पुस्तके भेट दिली आहेत. या वाचनालयात शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, प्रेरणादायी व इतर विषयांवरील पुस्तके उपलब्ध असतील.

पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रवाशांच्या हितासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी वचनबद्ध असून या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.