पुणे, ०७/१०/२०२५: पीएमपीएमएल ची बसस्थानके अथवा बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम आहे. परंतु रिक्षाचालक सदरचे नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रास पीएमपीएमएल च्या मुख्य बसस्थानकांचे परिसरात येवून बसप्रवाशांची वाहतूक करतात. तसेच बसचालकांना अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा लावत असल्याबाबतच्या तक्रारी परिवहन महामंडळाचे चालक, प्रवाशी व प्रवाशी मंचाकडून वारंवार प्राप्त झाल्या आहेत.
त्या अनुषंगाने नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणेकामी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे आदेशान्वये परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करणेत आलेले असून या पथकासमवेत सोबत प्रादेशिक परिवहन विभागाकडील (आरटीओ) अधिकारी देखील असतात. परिवहन महामंडळाकडील ३ पर्यवेक्षकीय अधिकारी व १ आरटीओ अधिकारी यांचे पुणे शहरासाठी १ व पिंपरी-चिंचवड शहरासाठी १ अशी दोन संयुक्त दक्षता पथके तयार करणेत आलेली असून या संयुक्त पथकाच्या माध्यमातून पुणे शहरातील पीएमपीएमएल च्या मुख्य बसस्थानकांच्या ५० मीटरच्या परिसरात येवून नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणेत येत आहे. कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे-
दिनांक – बसस्थानकांची नावे – रिक्षांची संख्या – वसूल केलेली दंड रक्कम
०१/१०/२०२५ – स्वारगेट मुख्य बसस्थानक – ०२ – ४०००/-
०३/१०/२०२५ – पुणे स्टेशन परिसरातील बसस्थानके, येरवडा, रामवाडी मेट्रो स्टेशन, वाकडेवाडी एस.टी. स्टँड – ०८ – १६०००/-
०६/१०/२०२५ – स्वारगेट मुख्य बसस्थानक, कात्रज चौक परिसरातील बसस्थानके – ०५ – ७०००/-
एकूण- १५ -२७०००/-
पीएमपीएमएल बस स्थानकांलगत रिक्षा व इतर खाजगी वाहने उभी केल्यामुळे बस थांबवण्यास अडथळा होतोच शिवाय अपघाताची देखील शक्यता असते. त्यामुळे पीएमपीएमएल बस स्थानकांचे परिसरात रिक्षा व इतर खाजगी वाहने उभी करू नयेत. पीएमपीएमएल बसस्थानकांच्या परिसरात रिक्षा व इतर खाजगी वाहने उभी केल्यास सदरचे वाहनांवर आरटीओ अधिकारी व पीएमपीएमएल पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्या संयुक्त पथकामार्फत कारवाई करण्यात येईल.
More Stories
Pune: मौजे निंबुत येथील आरोग्य शिबिरात अडीच हजार नागरिकांची तपासणी
खडकी स्टेशन परिसरातील वाहतुकीची समस्या न सोडवल्यास आंदोलन करणार – सुनील माने
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार – केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ