पुणे, दि. ३१ ऑक्टोबर २०२५: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी (ता. कोपरगाव) येथील श्री. नाना जाधव यांनी जिल्हा विधी सेवा समिती, पुणे व जिल्हाधिकारी (स.यो.) पुणे यांचेकडे अर्ज देऊन आपले तसेच इतर नऊ कुटुंबांतील ऊसतोडणीस गेलेले कामगार मौजे राहु (माधवनगर), ता. दौंड, जि. पुणे येथील जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांनी बंधक ठेवले असल्याची तक्रार केली होती. संबंधित मालकाने कामगारांना मूळ गावी न जाण्यास सक्ती केली होती तसेच मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व महिलांचा अनादर करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा विधी सेवा समिती, पुणे यांच्या वतीने अॅड. देवभक्त महापुरे, अॅड. सुनिल म्हस्के आणि दीपक पवार यांची समिती गठीत करण्यात आली. समितीतील सदस्य, स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, कामगार आयुक्तालयाचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी जयंत भोसले, ग्राम महसूल अधिकारी राहु, कामगार विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून कारवाई केली.
या संयुक्त मोहिमेत एकूण २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बंधमुक्त करण्यात येऊन संबंधित जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात “The Bonded Labour System (Abolition) Act, 1976” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व कामगारांना आवश्यक प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वाहतुकीची सोय करून देण्यात आली. ही कारवाई दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

More Stories
वासोटा किल्ला १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी खुला; चार महिन्यांनंतर पुन्हा दुर्गभ्रमंतीसाठी हिरवा कंदील
मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या कामांना मिळणार गती ; पुणे महापालिकेतर्फे १२२३ कोटींच्या निविदा मंजूर
Pune: “वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गान करण्याबाबत आयोजन, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य