सातारा, १ नोव्हेंबर २०२५: सह्याद्रीच्या निसर्गरम्य सान्निध्यात वसलेला आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला अखेर चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्ती आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेल्या या दुर्गावर १ नोव्हेंबरपासून पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
किल्ला खुला झाल्याने बामणोली, मुनावळे, शेंबडी, तापोळा आणि अंबवडे परिसरातील बोट मालक, ट्रेक आयोजक आणि तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक रोजगार आणि पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वासोटा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसागर जलाशय ओलांडून कोयना अभयारण्याच्या मार्गाने या दुर्गावर पोहोचावे लागते. प्रवासादरम्यान दिसणारे घनदाट जंगल, सदाहरित वृक्षराजी आणि अथांग जलाशय पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा मंत्रमुग्ध अनुभव देतात. उंच कडे, खोल दऱ्या आणि शांत वातावरणामुळे वासोटा हा ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक आकर्षक गंतव्यस्थान ठरतो.
वासोट्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने तेथे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे ओलावा जास्त राहतो आणि जळू (कानीट) या कीटकांचे प्रमाण वाढते. हे कीटक पायाला चिकटून रक्त शोषतात आणि नंतर आपोआप गळून पडतात. त्यामुळे पर्यटकांनी ट्रेकदरम्यान योग्य पादत्राणे, औषधी मलम आणि प्रतिजैविक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
वासोटा पर्यटन शुल्क रचना
प्रौढांसाठी प्रवेश शुल्क: १०० रुपये प्रति व्यक्ती
१२ वर्षांखालील मुलांसाठी: ५० रुपये
गाईड शुल्क: २५० रुपये
बोट / वाहन शुल्क: १५० रुपये
कॅमेरा शुल्क:
डीएसएलआर/लेन्स कॅमेरा – १०० रुपये
साधा / पॉइंट अँड शूट कॅमेरा – ५० रुपये
“वासोटा परिसर हा जैवविविधतेने नटलेला आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील भाग आहे. या ठिकाणचे सौंदर्य अनुभवताना पर्यटकांनी निसर्गसंवर्धनाला प्राधान्य द्यावे.”
— विजय बाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), बामणोली

More Stories
मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या कामांना मिळणार गती ; पुणे महापालिकेतर्फे १२२३ कोटींच्या निविदा मंजूर
Pune: “वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गान करण्याबाबत आयोजन, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
Pune: शिवसेना महिला आघाडीचे आक्रमक आंदोलन – रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी!