November 5, 2025

जुन्नर-शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर; वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा

पुणे, ४ नोव्हेंबर २०२५: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर आणि शिरूर परिसरात अलीकडच्या काळात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. “या भागातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण हेच प्राधान्य असेल. यासाठी निधी कमी पडू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वनमंत्री नाईक यांनी २०० पिंजरे तातडीने बसविण्याचे आदेश दिले असून, आणखी १००० पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जाईल आणि नागरिकांना तात्काळ सूचना (‘अलर्ट’) देण्यात येतील.

या बैठकीस माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, वसंतराव जाधव, आशा बुचके, नाथाभाऊ शेवाळे यांसह विविध लोकप्रतिनिधी आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

वनमंत्री नाईक म्हणाले, “जुन्नर आणि शिरूर परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, त्यामुळे मनुष्यहानी होत आहे. या भागात वनरक्षकांची संख्या वाढविण्यात येईल तसेच शेती आणि गोठ्यांभोवती सौर कुंपण उभारले जाईल जेणेकरून बिबट्यांचा वावर मर्यादित राहील. नागरिकांचे संरक्षण हे आमचे प्राधान्य आहे.”

तसेच त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील पकडलेल्या बिबट्यांचे स्थलांतर वनतारा किंवा इतर राज्यांतील योग्य ठिकाणी केले जाईल. या सर्व मोहिमेसाठी वनविभागाला तातडीने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, त्याला त्वरित मान्यता मिळावी यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्रींची भेट घेणार आहे.

नाईक यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, “ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. कालच पकडलेल्या बिबट्याचे स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच आम्ही घटनास्थळी भेट देऊन स्थानिक जनप्रतिनिधींशी प्रत्यक्ष चर्चा करू,” असेही त्यांनी नमूद केले.

मुख्य निर्णय:
जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर आणि शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर
२०० पिंजरे तातडीने बसविणार; आणखी १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटींचा निधी
बिबट्यांच्या हालचालींसाठी एआय व सॅटेलाइटवर आधारित ‘अर्लट’ प्रणाली
शेती व गोठ्यांसाठी सौर कुंपणाची योजना
बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे; शिष्टमंडळ लवकरच भेटणार