November 11, 2025

Pune: पीएमपीएमएल कडून बसस्थानकांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई

पुणे, ११/११/२०२५: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील सृष्टी हॉटेल चौक बसस्टॉप येथे अनधिकृत जाहिराती, बॅनर, पोस्टर व पलेक्स लावून बसस्थानकाचे विद्रुपीकरण करण्यात आले असल्याची तक्रार तक्रार पीएमपीएमएल कडून दाखल करण्यात आली आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या दि. ०८ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार, या प्रकरणी सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड शहर पोलीस यांच्याकडे महाराष्ट्र मालमत्ता विरूपण अधिनियम १९९५ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामंडळाची परवानगी न घेता बसस्थानकावर जाहिराती लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून, संबंधितांवर कायदेशीर दंडात्मक प्रक्रिया सुरू आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना निर्देश दिले आहेत की, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व बसथांबे आणि बसशेडची नियमित पाहणी करावी. अनधिकृत जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा तसेच बसस्थानकावरील जाहिराती काढून परिसर स्वच्छ ठेवावा.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. सार्वजनिक मालमत्ता स्वच्छ, सुरक्षित आणि जाहिरातीविरहित ठेवण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांनी अशा अनधिकृत जाहिराती दिसल्यास त्वरित जवळच्या डेपो व्यवस्थापक यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.